आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:जिल्हा बँक मतदानावर भाजपचा बहिष्कार, संपूर्ण प्रक्रियाच खोटी असल्याचा पंकजा मुंडे यांचा आराेप

बीडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीचा अवमान झालेला आहे. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रियाच खोटी असून २० मार्चच्या मतदानावर आम्ही बहिष्कार घालत आहोत, असे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी दुपारी बीड येथील पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.

कोरम पूर्ण होईल एवढे उमेदवारच होणार नसून सुरळीत चालू असलेल्या बँकेवर प्रशासक आणण्याचा पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा डाव असल्याचा आरोपही पंकजा यांनी केला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी शुक्रवार, २० मार्च रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या निवासस्थानी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली.

त्यानंतर आयाेजित पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, आम्ही लोकशाही प्रक्रिया म्हणून या निवडणुकीकडे पाहत होतो. पाच वर्षांत बँकेत शेतकऱ्यांचे हित पाहिले. कर्जबुडव्यांना बाजूला ठेवून बँक नफ्यात आणली, कारभार सुरळीत केला. सुरुवातीला लोकांना देण्यासाठी एक रुपयादेखील नव्हता, परंतु चांगला कारभार करत लोकांना बोलावून त्यांच्या ठेवी परत दिल्या. या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर झाला. सेवा सोसायटीचे उमेदवार बाद केले. सहकारमंत्र्यांवर दबाव आणून अन्याय केला गेला. जो नियम परभणीच्या बाबतीत तो आम्हाला का नाही, असा सवाल पंकजा यांनी केला.

अधिकाऱ्यांवर दबाव आणून अजब-गजब पद्धतीचा अवलंब करण्याचा प्रयत्न यात झाला असून या जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम विद्यमान सत्ताधाऱ्यांनी केले आहे. पत्रकार परिषदेस माजी आमदार भीमसेन धोंडे, सुभाषचंद्र सारडा, राजाभाऊ मुंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश आडसकर, अक्षय मुंदडा, अशोक लोढा आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...