आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकमेकांचे राजकीय विरोधक असलेले पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यातील बहिण-भावाचे प्रेमाचे नाते पुन्हा एकदा पाहायला मिळाले. मंगळवारी पाथर्डी येथे नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे व पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर आले. यावेळी माझा भाऊ मोठा झाल्याचा मला आनंदच आहे, असे कौतुकाचे उद्गार पंकजा मुंडेंनी काढले. तर, पंकजा आणि माझ्यात सुईच्या टोकाऐवढेही वैर नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले.
पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील नारळी सप्ताहानिमित्त एकाच व्यासपीठावर पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांनी केलेल्या राजकीय टीकाटिप्पणीमुळे राजकीय वर्तुळात हा धार्मिक कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला.
काही जण देव पाण्यात टाकून बसले
यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझा मोठा भाऊ आता खरेच मोठा झाल्याचा मला आनंदच आहे. धनंजयनंतर 4 वर्षांनी माझा जन्म होण्यामागे कारी तरी कारण असेलच ना. म्हणूनच मी त्याच्या पाठीवर जन्माला आले असेल. धनंजय आणि मी एकत्र येऊ नये म्हणून काही जण देव पाण्यात टाकून बसले होते.
आमच्यात काहींनी लावालावी केली
पंकजा मुंडे म्हणाल्या की, धनंजय व माझ्यात काहींनी लावालावी केली ती मला माहिती नाही, मात्र माझ्यासाठी जनता महंत आहे. माझ्यावर माझी काकू व आईचे संस्कार आहेत. गडासाठी स्व. मुंडेंनी काय दिले ते आम्हाला कधी सांगितले नाही. मला गडाचे राजकारण करण्याची गरज नाही. सध्याचे सरकार चांगली मदत करत आहे. गडावरील कामासाठी मी गवंडीकाम करेन.
केवळ राजकीय मतभेद
तर, धनंजय मुंडे म्हणाले की, या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंकजा माझ्या काही गज का होईना जवळ आल्या. माझ्यात व पंकजात सुईच्या टोका इतकेही वैर नाहीत. आमच्या मतभेदाच्या ज्या काही बातम्या येतात त्या केवळ राजकीय मतभेदाच्या असतात. विचारांमध्ये अंतर पडले तरी चालेल मात्र घरातील संवादामध्ये अंतर नसले पाहीजे.
...म्हणून दोघेही एकत्र
धनंजय मुंडे म्हणाले की, घरातील माणसांत संवाद असावा असे वाटत होते ते आज घडले आहे. गडाच्या बाबतीत जी जबाबदारी असेल ती बहीण, भाऊ म्हणून आम्ही ती पार पाडू. माझी नियतीवर श्रद्धा आहे. जे घडले ते चांगले घडले. आम्ही राजकीयदृष्ट्या वेगळे झाल्याने दोघेही आमदार झालो व मंत्री झालो. एकत्र असतो तर असे घडले असते का?
संबंधित वृत्त
पंकजांनी अहंकार कमी करावा- महंत नामदेवशास्त्री, संतांनी राजकारण करू नये- पंकजा मुंडेंचे प्रत्युत्तर
पंकजा मुंडे यांच्याशी माझे वैर नाही, मात्र तिच्या जवळचे लोक चुकीचे आहेत, पंकजाने आपला अहंकार कमी करावा, असा सल्ला भगवानगडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री यांनी दिला. तर, कीर्तनाच्या मंचावर संतांनी राजकारण करू नये, असे प्रत्युत्तर पंकजा मुंडे यांनी दिले. पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील नारळी सप्ताहानिमित्त भगवानगडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री व पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर आले होते. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.