आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृतिदिन:पंकजा मुंडे : काय मिळेल चिंता नाही, दिलेल्या संधीचे सोने करेन शिवराजसिंह चौहान : मुंडेंच्या कार्याचा वारसा सर्व मिळून पुढे नेऊ

परळीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सत्त्व, तत्त्व, ममत्व हा माझ्या राजकारणाचा पाया आहे. उद्या काय मिळणार याची मला चिंता नाही, पण दिलेल्या संधीचे सोने करेन हे माझ्यावर मुंडे साहेबांचे संस्कार आहेत, असे प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले. तर, लोकनेते गोपीनाथ मुंडे म्हणजे अविरत संघर्ष, साहस आणि वंचित घटकांची सेवा याचा त्रिवेणी संगम आहे. त्यांच्या कार्याचा वारसा आपण सर्व मिळून पुढे घेऊन जाऊ, असे प्रतिपादन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शुक्रवारी पांगरी (ता. परळी) येथील गोपीनाथगडावर केले. पांगरी येथील गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी आयोजित कार्यक्रमास मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दुपारी ३.४० वाजता हजेरी लावली. कार्यक्रमापूर्वी त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडेंच्या समाधिस्थळी जाऊन पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. उद्योगपती पद्मश्री मिलिंद कांबळे, गोरक्षक पद्मश्री सय्यद शब्बीर, मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्यां प्रीती पाटकर, कविता वाघ यांचा गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी प्रज्ञाताई मुंडे, आर्यमन पालवे, रासपचे महादेव जानकर, खासदार सुजय विखे, माजी आमदार भीमराव धोंडे, सुरेश धस, रत्नाकर गुट्टे, राजेश पवार, राधाताई सानप, आर. टी. देशमुख, बाळासाहेब मुरकुटे, अक्षय मुंदडा, राजेंद्र मस्के, गोविंदराव केंद्रे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्ञानदेव काशीद यांनी, तर प्रवीण घुगे यांनी मानले. राज्यभरातून हजारो लोक गोपीनाथ गडावर दाखल झाले होते.

नेता किंवा मुख्यमंत्री म्हणून नाही तर गोपीनाथ मुंडेंचा भाऊ म्हणून उपस्थित ^मी आज गोपीनाथगडावर भाजपचा नेता किंवा मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री म्हणून आलो नाही, तर गोपीनाथ मुंडेंचा भाऊ म्हणून उपस्थित आहे. भाजपचे मजबूत संघटन आज देशभरात दिसून येते. या संघटनाला महाराष्ट्राच्या गावागावांत पोहोचवण्याचे काम गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांनी केले. वंचित, उपेक्षित, पीडित घटकांना न्याय देण्याचे काम त्यांनी जीवनभर केले. गोपीनाथ मुंडे स्वतः गरीब परिवारातून आल्याने गरिबीच्या झळा अनुभवतच त्यांनी राजकारणात गरिबांसाठी काम करण्याची प्रेरणा घेतली. -शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री, मध्य प्रदेश.

परळीतील पराभवाने मला दिल्लीला नेले, नातं कायम ^पराभवाचेही सोने करता आले यापेक्षा काय हवे. परळीतील पराभवाने मला दिल्लीला नेले. शिवराजसिंहांसारखे सात्त्विक लोक लाभले. तुमचं-आमचं नातं मुंडे साहेबांपासून आहे. इथे तुम्ही मुंडे साहेबांच्या अंत्यविधीला आला होता. त्याच ठिकाणी आज तुम्ही आला आहात. मी मध्य प्रदेशची प्रभारी असेन-नसेन; पण तुमच्याशी जोडलेलं आमचं नातं कायम राहील. -पंकजा मुंडे, राष्ट्रीय सचिव, भाजप

एमपीचे मुख्यमंत्री चौहान हेलिकॉप्टरने आले शुक्रवारी सकाळी गोपीनाथगडावर रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या कीर्तनासाठी हजारो लोकांची गर्दी झाली होती. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे दुपारी ३.४० वाजता मध्य प्रदेश शासनाच्या विशेष हेलिकॉप्टरने गोपीनाथगडावर आगमन झाले. गडावर येताच चौहान यांनी मुंडेंच्या समाधीचे दर्शन घेतले. गोपीनाथगडावर पंगतीत पंकजा मुंडे झाल्या वाढपी पंकजा मुंडे या गोपीनाथगडावरील कीर्तनात सहभाग घेऊन हरिनामात तल्लीन झाल्या, तर दुपारी पंगतीत वाढपी होऊन भोजनाचे वाटप केले. गोपीनाथगडावर शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक पंगती बसवल्या होत्या.

चौहान यांनी केले पाच बालिकांचे ‘कन्यापूजन’ गोपीनाथगडावर शुक्रवारी बंजारा समाजाच्या महिलांनी आपल्या पारंपरिक वेशभूषेत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे स्वागत केले. या सत्काराने चौहान भारावून गेले. महिलांनी भेट दिलेला पट्टा त्यांनी कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत काढला नाही. या वेळी चौहान यांनी पाच बालिकांचे “कन्यापूजन’ केले.

बातम्या आणखी आहेत...