आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळीकर मंत्रमुग्ध:‘महाराष्ट्राच्या लोकगाणी’तून परळीकर मंत्रमुग्ध; शाहीर रामानंद उगले कला मंचचे यशस्वी आयोजन

अंबाजोगाई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने दरवर्षी मराठवाडा साहित्य परिषद ‘चैत्रचाहूल कवितेची’ हा उपक्रम आयोजित करत असते. यावर्षी परळीकरांसाठी शाहीर रामानंद- कल्याण उगले संयोजित ‘महाराष्ट्राची लोकगाणी’ हा पारंपारिक कला प्रकारांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. पोवाडा, भारुड, बतावणी, गण आणि लोक - गीतांचा परळीकरांनी या कार्यक्रमात मनमुराद आस्वाद घेतला. यासह महाराष्ट्रातील विविध कलाप्रकार सादर करुन शाहीर रामानंद उगले आणि कला मंचाने परळीकरांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकले.

याच कार्यक्रमात बंसल क्लासेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त घेण्यात आलेल्या टॅलेंट सर्च परीक्षा आणि इतर स्पर्धात्मक परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणही करण्यात आले. हा दिमाखदार व देखणा सोहळा बंसल क्लासेस माधवबाग येथील मैदानावर सुरेखपणे पार पडला.

गेल्या दोन वर्षापासून कोविडकालीन परिस्थितीमुळे आणि कडक निर्बंधांमुळे एवढा मोठा सार्वजनिक कार्यक्रम परळीकर अनुभवू शकले नव्हते. परळी मसाप शाखेने ही परळीकरांची सांस्कृतिक गरज ओळखून शाहीर रामानंद- कल्याण उगले यांच्या विविध लोककला सादरीकरणाची जणू मेजवानीच सर्वांसाठी दिली. शाहीर रामानंद उगले यांनी महाराष्ट्रातील विविध पारंपारिक लोककला प्रकार साभिनय पणे परळीकरां समोर मांडले व तेवढ्याच ताकतीने परळीकर यांनीही त्याला उत्स्फूर्तपणे दाद दिली.

या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून परळी मसापचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, बन्सल क्लासेसचे संचालक रामेश्वर बांगड, बद्रीनारायण बाहेती, प्रा. कैलास घुगे, प्राचार्य हंडिबाग, मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष पी.एस.घाडगे, ज्येष्ठ साहित्यिक विश्वंभर वराट, वैद्यनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य मेश्राम, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य अतुल दुबे, सुरेश टाक आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

तसेच या कार्यक्रमास परळी व अंबाजोगाई परिसरातील साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परळी मसापचे सचिव प्रा.डॉ.राजकुमार यल्लावाड यांनी केले तर सूत्रसंचालन परळी मसापचे कार्याध्यक्ष अनंत मुंडे व प्रसिद्धीप्रमुख बालाजी कांबळे यांनी केले. यावेळी नागरिक हजर होते.

बातम्या आणखी आहेत...