आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य:घराच्या झडतीत पोलिसांनी गर्भपाताच्या गोळ्यांसह इतर साहित्य केले जप्त; महिला-बालविकासकडूनही चौकशी सुरू

बीड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गर्भवती मातांची नोंदणी, त्यांना पोषण आहार देण्याचे काम गावपातळीवर अंगणवाडी कार्यकर्ती करत असते. यातूनच अर्धमसला (ता. गेवराई) अंगणवाडी सेविका गर्भलिंगनिदानासाठी सावज हेरायची. अनेक वर्षांपासून हा प्रकार बिनबोभाट सुरू होता. अखेर गर्भवतीच्या मृत्यूने बिंग फुटले अन् या अंगणवाडी सेविकेला पोलिसांनी गजाआड केले. मनीषा शिवाजी सानप असे या अंगणवाडी सेविकेचे नाव आहे.

सीताबाई ऊर्फ शीतल गाडे (रा. बकरवाडी) या चौथ्यांदा गर्भवती असलेल्या महिलेचा गर्भपातादरम्यान अतिरक्तस्राव होऊन मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणात आता गर्भलिंगनिदान व अवैध गर्भपात करणारी साखळी समोर आली. यात अर्धमसला (ता.गेवराई) येथील अंगणवाडी कार्यकर्ती मनीषा सानप हीच प्रमुख दुवा आहे. गर्भवती महिलांना घरी बोलावून, तिथेच गर्भलिंगनिदान केले जात होते. औरंगाबादहून एक डॉक्टर यासाठी येत होता.

तो गर्भलिंगनिदान करत असे त्या खोलीत नातेवाइकांनाही प्रवेश दिला जात नसे. सूत्रांच्या माहितीनुसार, मनीषा सानप ही डॉक्टरसाठी एजंट म्हणून काम करत होती. गर्भलिंगनिदान करण्यासाठी पोर्टेबल सोनोग्राफी मशीन घेऊन हा डॉक्टर येत असे. दरम्यान, मुलीचा गर्भ असल्यास व नातेवाइकांना हा गर्भपात करायचा असेल तर मनीषा हीच गर्भपाताचीही जबाबदारी घेत असल्याचा पोलिसांना संशय आहे. तिच्या घरझडतीत गर्भपाताच्या गोळ्या व इतर साहित्य जप्त केले.

महिला-बालविकासकडून चौकशी
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रम राबवणाऱ्या महिला व बालविकास विभागाची कर्मचारी असलेली अंगणवाडी सेविकाच या रॅकेटची सूत्रधार निघाली. जि.प.च्या महिला व बालविकास विभागाच्या गेवराई तालुक्यातील पर्यवेक्षकांनी बुधवारी अर्धमसला वस्तीच्या अंगणवाडीला भेट देऊन चौकशी केली.

जिल्हा रुग्णालयाकडून पत्र, औषध विभाग करणार तपास
मनीषा सानपकडे गर्भपाताच्या या गोळ्या कुठून आल्या, याबाबत चौकशी केली जाणार आहे.जिल्हा रुग्णालयाने याबाबत औषध विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. अशा प्रकारे विनापरवाना या गोळ्या विक्री करता येत नाहीत. -डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

अर्धमसला येथून अंगणवाडी सेविकेला केले गजाआड; पोलिस आता ‘त्या’ डॉक्टरच्या मागावर शेकडो जणींचे गर्भलिंगनिदान
मनीषा सानपच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. यात गर्भपातासाठी लागणारे सर्व साहित्य, गर्भपाताच्या गोळ्या, सोनोग्राफी करण्यासाठी लावले जाणारे जल क्रीम सापडले. पाच लिटरच्या या जलपैकी अर्धे जल संपलेले होते. एका सोनोग्राफीसाठी सुमारे १५ एमएल जल लागते. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर सोनोग्राफी केल्या जात असल्याचे स्पष्ट असून आतापर्यंत मनीषाच्या माध्यमातून शेकडो गर्भवतींचे गर्भलिंगनिदान व गर्भपात केले गेल्याचा संशय पोलिसांना आहे.

कोट्यवधींची माया
आंगणवाडी सेविका मनीषाला ६ हजार रुपये पगार. गर्भलिंगनिदान व गर्भपाताच्या या रॅकेटमधून तिने कोट्यवधींची माया जमवली. गेवराईत १ कोटीचा बंगला आहे. पोलिसांना घरझडतीत २९ लाख १३ हजारांची रोकड आढळली.जप्त केलेले गर्भपातासाठीचे सोनोग्राफीचे साहित्य.

बातम्या आणखी आहेत...