आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाशी लढा:महामारीबाबत अननुभवी तरीही कोरोनाच्या लढ्यात पोलिसांनी दाखवले धैर्य, मुंबई, मालेगाव, बीड पोलिसांच्या ‘स्ट्रॅटेजी’ची केंद्रीय संस्थेकडून दखल

बीड / अमोल मुळे7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचा सामना करताना देशातील पोलिसांनी कशा प्रकारे काम केले याचा अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट या संस्थेने प्रकाशित केला. यात प्रत्येक राज्यातील निवडक उदाहरणांवर प्रकाश टाकला आहे. महाराष्ट्रातून मुंबई, मालेगाव आणि बीड पोलिसांच्या कामाची दखल घेतली आहे. त्यांनी कोरोना महामारीच्या काळात केलेल्या कामाची विस्तृत माहिती यात दिली आहे. कधीही न पाहिलेली कोरोना महामारी केवळ आरोग्यविभागापुरतीच मर्यादित राहिली नाही तर पोलिसांवरही या महामारीचा मोठा ताण आला. पहिल्यांदाच एखाद्या आजाराच्या नियंत्रणासाठी पोलिस दल काम करत होते. तेही यासाठी कोणतेही विशेष प्रशिक्षण न घेता अथवा अशी कोणतीही पूर्वतयारी नसताना पोलिसांना महामारी हाताळावी लागली. पोलिसांच्या कार्यशैलीवर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट या संस्थेने ‘कोविड १९ महामारी संघर्षात भारतीय पोलिसांची भूमिका’ असा अहवाल प्रकाशित केला आहे.

मुंबई पोलिसांची माहिती
पोलिस उपायुक्त नियती ठाकर यांनी मुंबई पोलिसांसाठी कोरोना नियंत्रण कसे आव्हान होते याची माहिती अहवालात दिली आहे. वरळीसारख्या ठिकाणी जिथे २ चौरस किलोमीटरच्या परिसरात १ लाख लोक विशेषत: मच्छीमार वास्तव्यास आहेत तिथे कंटेनमेंट झोन कसे केले गेले, भाजीपाला मार्केट कसे सांभाळले गेले, धारावीत २ चौरस किलोमीटरच्या भागात १० लाख लोक इथे राहतात तिथे कोरोना नियंत्रणासाठी काय प्रयत्न केले, स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पाठवताना केलेल्या उपाययोजनांची विस्तृत माहिती दिली आहे.

प्रतिबंधात्मक उपायांमध्ये बीड
बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्गच उशिरा सुरू झाला. संचारबंदीच्या कडक अंमलबजावणीमुळे शेजारी जिल्ह्यात शेकडोंनी रुग्ण सापडत असताना बीड सुरक्षित होता. जनजागृतीसाठी सर्व धार्मिक गुरूंची मदत घेऊन नागरिकांना आवाहन केले गेले. गरजूंना धान्य वाटप केले गेले. ग्राम सुरक्षा दल स्थापन केले गेले. सोशल मीडियावर वॉच ठेवून अफवांना आवर घातला. व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. रुग्णांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केली गेली. होम क्वॉरंटाइन व्यक्तींवर नजर ठेवली गेली. पोलिसांसाठी कोविड सेल स्थापन केला गेला.

मालेगाव पॅटर्न चर्चेत
मालेगावात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या माहितीनुसार, मालेगावमध्ये ८ एप्रिलला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला, ९ एप्रिलला पहिला मृत्यू झाला. एप्रिलमध्ये ३० बाधितांचे मृत्यू झाले. पण नॉन काेविड रुग्णांना उपचार मिळत नसल्याने मृत्यूंची संख्या शेकडोंनी होती. पोलिसांनी सर्वधर्मीयांना, डॉक्टरांना सोबत घेऊन जागृती केली. औषधांचे वाटप केले, मृत्यू रोखण्यासाठी नियोजन केले, विविध उपक्रम राबवून कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणली.

बातम्या आणखी आहेत...