आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
माजी वनमंत्री संजय राठोड यांनी मृत पूजा चव्हाणच्या आई-वडिलांना ५ कोटी रुपये दिल्याचा सनसनाटी दावा करणाऱ्या पूजाच्या कथित चुलत आजी शांताबाई राठोड यांच्याविरोधात परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांताबाई या आमच्या नातेवाईक नसून त्या नाहक बदनामी करीत आहेत, अशी तक्रार पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी दिली आहे.
चुलत आजी असल्याचा दावा करून सोमवारी धारावती तांडा येथील शांताबाई राठोड या महिलेने पूजा चव्हाणच्या पालकांवर गंभीर आरोप केल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर मंगळवारी पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी परळी शहर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.
शांताबाई राठोड या आमच्या नातेवाईक नाहीत. नातेवाईक असल्याचे सांगून त्या कुटुंबीयांची बदनामी करत आहे. म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व बदनामी थांबवावी, असे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनुसार भादंवि ५०० व ५००१ प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे न्यायालयात दुसरा खटला दाखल
टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची वानवडी पोलिसांनी चौकशी करावी. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करावा. याबाबतचे आदेश न्यायालयाने पोलिसांना द्यावेत, अशी मागणी करणारा खटला लष्कर न्यायालयात दाखल झाला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वकील आघाडीने याबाबत न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. त्यावर झालेल्या युक्तिवादानंतर हा खटला दाखल झाला आहे. या प्रकरणात दाखल झालेला हा दुसरा खटला आहे. यापूर्वी लीगल जस्टिस सोसायटीतर्फे ॲड. भक्ती पांढरे यांनीदेखील फिर्याद दिली होती. त्यानुसार हा खटला दाखल आहे. याप्रकरणी पोलिसांना आदेश द्यायचे अथवा नाही याबाबत दोन्ही अर्जांवर ५ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास व्हावा. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना द्यावेत यासाठी खटला दाखल केला आहे, अशी माहिती भाजप वकील आघाडीच्या अध्यक्ष ॲड. ईशाना जोशी यांनी दिली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.