आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पशूंचे आरोग्य:बदलत्या वातावरणात लंपीच्या प्रादुर्भावाची शक्यता; पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन

​​​​​​​पाटोदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांतील सततच्या बदलत्या हवामान व वातावरणाचा मानवाचा आरोग्याबरोबरच पशूंच्या आरोग्यावरही मोठा परिणाम होतो. सध्या जिल्ह्यातील काही ठिकाणी जनावरांत लंपीसदृश आजाराची लक्षणे दिसून आल्याने सध्या पशुधनावर लंपी रोगाचे सावट असल्याचे चित्र आहे. पाटोदा तालुका व परिसरात अद्यापपर्यंत या आजाराचे जनावर दिसून आले नसले तरीही पशुमालकांनी आपल्या पशुधनाची योग्य प्रकारे काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले.

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, लंपी या रोगाचा संसर्ग कॅप्रिपॉक्स विषाणूमुळे होतो. हा विषाणू शेळ्या व मेंढ्यांमधील देवी रोगाच्या विषाणूशी संबंधित आहे. या लंपी रोगाच्या लक्षणांमध्ये जनावरांच्या अंगावर १० ते २० मिमी व्यासाच्या गाठी येतात. सुरुवातीस भरपूर ताप, डोळ्यातून, नाकातून चिकट द्रव येणे, चारा-पाणी खाणे कमी अथवा बंद करणे, दूध उत्पादन कमी होणे, काही जनावरांच्या पायावर सूज येणे व लंगडणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात.

डास, माशा, गोचीड, चिलटे, बाधित जनावरांचा स्पर्श, दूषित चारा-पाणी यामुळे या आजाराचा प्रसार होतो. लंपी या आजारापासून आपल्या जनावरांना वाचवण्यासाठी पशुमालकांनी बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवणे, कोणत्याही संभाव्य रोगी जनावरास निरोगी जनावरांच्या कळपात प्रवेशास बंदी करणे, रोग प्रादुर्भाव झालेल्या गावातील बाधित व निरोगी जनावरांना चराऊ कुरणांमध्ये एकत्रित सोडण्यास मनाई करणे, डास, गोचीड व तत्सम किड्यांचा बंदोबस्त करणे, तसेच निरोगी जनावरांच्या अंगावर किडे न चावण्यासाठी औषध लावणे व गोठ्यामध्ये यासाठीच्या औषधांची फवारणी करणे आदी उपाययोजना करण्याचे आवाहन केले.

लस उपलब्ध होताच जनावरांचे लसीकरण करून घ्या
लंपीसदृश आजाराची जनावरे आढळल्यास तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून उपचार करून घ्यावेत. त्वचेवरील गाठीचे जखमेत रूपांतर झाल्यास जखमेत जंतू पडू नये, यासाठी जखमेवर औषध मलम लावावे. या आजाराचे लस सध्या या ठिकाणी उपलब्ध नसली तरीही लवकरच उपलब्ध होईल व ती झाल्यानंतर पशुपालकांनी शासनाच्या सूचनेनुसार जनावरांचे लसीकरण करून घ्यावे.
- डॉ. बळीराम राख, पशुधन विकास अधिकारी, पाटोदा

बातम्या आणखी आहेत...