आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोव्हेंबर महिन्यातच शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या कापू नयेत, असे आदेश दिल्यानंतरही हा प्रकार थांबलेला नाही. लाइनमनने शेतातील सिंगल फेज डीपीचा वीजपुरवठा तोडल्याने रब्बी पिके डोळ्यादेखत जळत होती. ही बाब पाहवली जात नसल्याने गेवराई तालुक्यातील मालेगाव बुद्रुकच्या शेतकऱ्याने सोशल मीडियावर लाइव्ह येत “आता सर्व संपलं...’ असे म्हणत विष घेतले. नारायण भगवान वाघमोडे असे विष घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. बीडच्या खासगी रुग्णालयात ते मृत्यूशी झुंज देत आहेत.
मालेगाव बुद्रुक येथील शेतकरी नारायण यांच्या शेतात सिंगल फेजची डीपी आहे. येथील वीज खंडीत केल्यानंतर वीज सुरळीत करण्याची विनंती केली होती. परंतु मोरे यांनी ऐकले नाही. २४ डिसेंबर रोजी नारायण यांनी कीटकनाशक प्राशन केले होते. लाइव्ह व्हिडिओ पाहत काही तरुणांनी घटनास्थळी जात वाघमोडे यांना गेवराई येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. येथे प्राथमिक उपचार करून वाघमोडे यांना बीड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. वाघमोडे यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, सहा वर्षांपूर्वी मालेगाव बुद्रुक येथील लाइनमन विठ्ठल मोरेने गावठाणचा १०० केव्हीचा ट्रान्सफाॅर्मर कुरणपिंपरी येथील शेतकऱ्यांना खासगी स्वरूपात लाखोंना विकल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
आठ शेतकऱ्यांची ताेडली वीज : शेतकऱ्याने विष घेतल्याचे कळताच महावितरणकडून वीजेचे कनेक्शन त्याच दिवशी पुन्हा जोडले. मालेगाव खु.येथील एक शेतकरी एक डिपी या योजनेतील आठ शेतकऱ्यांचे कनेक्शन कट केले होते.
खुलासा मागवला
^घटना सोमवारी सकाळी मला समजताच मी लगेच लाइनमन विठ्ठल मोरे यांच्याकडून खुलासा मागवला आहे. त्यांच्याकडून अद्याप स्पष्टीकरण आलेले नाही.
-ए. ए. नरुले, कनिष्ठ अभियंता, उमापूर वीज केंद्र, ता.गेवराई.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.