आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना फटका़:आठवीपर्यंत प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती बंद; जिल्ह्यात 41 हजार विद्यार्थ्यांना फटका़

अमोल मुळे | बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाच्या वतीने अल्पसंख्याक गटातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी वार्षिक एक हजार रुपयांची शिष्यवृत्ती आता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना बंद करण्यात येणार आहे. आरटीईनुसार आठवीपर्यंत मोफत शिक्षण दिले जात असल्याने शिष्यवृत्तीची आवश्यकता नसल्याचे कारण केंद्राने दिले आहे. दरम्यान, या निर्णयाचा जिल्ह्यातील ४१ हजार ६३७ विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. दरम्यान, गुरुवारी खा. प्रीतम मुंडे यांनी थेट लोकसभेत हा मुद्दा मांडला.

पहिली ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या अल्पसंख्याक गटातील म्हणजेच मुस्लिम, बौद्ध, जैन, पारसी, शिख, ख्रिश्चन या सहा समाजांतील विद्यार्थ्यांना केंद्र शासनाकडून सन २००७ पासून प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. एक लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या पालकाच्या पाल्याला वार्षिक १ हजार रुपये शासनाकडून दिले जात होते. एका पालकाच्या दोन विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळू शकते. यासाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर विद्यार्थ्यांकडून अर्ज भरुन घेतले जातात. यंदाही ऑक्टोबरमध्ये विद्यार्थ्यांकडून अर्ज भरुन घेण्यात आले होते. शाळांनी हे अर्ज प्रमाणित केले होते. अर्ज पडताळणी करुन केंद्र शासनाकडे पाठवण्याची जबाबदारी शिक्षण संचालक (योजना) या कार्यालयाकडे आहे. त्यानुसार, ५ नोव्हेंबर पर्यंत ही प्रक्रिया राबवली होती.

दरम्यान, आता केंद्र शासनाने एक सूचना जारी करुन पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण हे शिक्षण हक्क कायद्यानुसार मोफत असल्याने या वर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत हे अर्ज फेटाळले आहेत. जिल्ह्यात यंदा पहिली ते आठवीमधील १८ हजार १५५ विद्यार्थ्यांनी नव्याने अर्ज केले होते. तर, यापूर्वी आठवीपर्यंतच्या ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत आहे अशा २३ हजार ५२२ विद्यार्थ्यांनी नूतनीकरणासाठी अर्ज केले होते. असे एकूण ४१ हजार ६३७ अर्ज फेटाळण्यात आले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे.

खर्च गेला वाया : अर्ज करण्यासाठी तहसीलदारांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधार, राष्ट्रीयीकृत बँकेत खाते काढावे लागते कारण शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होते. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे अशा सगळ्या बाबींसाठी एका विद्यार्थ्यांला सुमारे एक ते दीड हजार रुपयांचा खर्च आला होता. मात्र आता हे अर्ज रद्द केल्याने विद्यार्थ्यांचा हा खर्च वाया गेला आहे.

नववी, दहावीला मात्र दिलासा
दरम्यान, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणारी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती ही आठवीपर्यंत नाकारली असली तरी नववी आणि दहावीमधील विद्यार्थ्यांचे अर्ज प्रमाणित करुन पाठवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळणार असल्याने त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

मागणीचा विचार करावा
दरम्यान, प्री-मॅट्रिक शिष्यव़ृत्तीत आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुन्हा सामावून घ्यावे यासाठी आतापर्यंत अनेकांनी निवेदन दिले आहेत. खा. मुंडे यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित करुन समाजाच्या मागणीचा विचार केला असल्याचे भाजप अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सलीम जहाँगीर म्हणाले.

शिष्यवृत्ती सुरू ठेवावी
अल्पसंख्यांक समुदायाला शासनाचे शिक्षणासाठी प्रोत्साहन आहे हे कळावे, गरिब वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेच्या फिस व्यतिरिक्त लागणारा वह्या व इतर खर्च करता यावा व यातून प्राेत्साहन मिळून मुले पुढे जावीत यासाठी ही शिष्यवृत्ती सुरु ठेवावी - मिर्झा कैसर बेग, पालक, कामखेडा

बातम्या आणखी आहेत...