आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मूळ परळीतील आणि पुण्यात जाऊन आत्महत्या करणाऱ्या तरुणीच्या प्रकरणाला दरराेज नवीन वळण येत आहे. या प्रकरणाशी एका माजी मंत्र्याचे नाव जाेडले गेल्यानंतर सातत्याने आराेप-प्रत्याराेपाच्या फैरी झडत आहेत. आत्महत्या केलेल्या तरुणीच्या दहावीत शिकणाऱ्या लहान बहिणीचा माेबाइल तिच्याच मामेभावाने हिसकावून नेल्याचे समाेर आले आहे. या माेबाइल पळवल्याचा संबंध आता मृत तरुणीच्या लॅपटाॅप व माेबाइल प्रकरणाशी जाेडला जात आहे. मृत मुलीचा मामा राजू राठाेड यांचा मुलगा अविनाशने माेबाइल पळवल्याचे समाेर येताच पाेलिसांनी त्याला अटक करून न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने त्याला तीन िदवसांची पाेलिस काेठडी सुनावली.
मृत मुलीच्या बहिणीला ४ मार्च राेजी सायंकाळी ७.३० वाजता अविनाशने घराबाहेर बाेलावले. ती घराबाहेर येताच परळी शहरातील फाउंडेशन शाळेसमोर तोंडाला रुमाल बांधून आलेला एक तरुण व तरुणीने तिच्या हातातून मोबाइल हिसकावून दुचाकीवरून पळ काढला. याप्रकरणी शुक्रवार, ५ मार्च रोजी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला. बहिणीच्या माेबाइल चाेरीचा संबंध आत्महत्या करणाऱ्या मुलीच्या प्रकरणाशी जाेडला जाऊ लागला आहे. मृत मुलीचा लॅपटाॅप व घटनेच्या वेळी असलेला माेबाइल चाेरीला गेल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने लहान बहिणीचा माेबाइलदेखील याच प्रकरणातील व्यक्तींनी कट रचून हिसकावून घेतला की काय, अशी परळीत चर्चा सुरू झाली. परळी शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत वसंतनगर येथून शुक्रवारी मध्यरात्री अविनाश राजू राठोड (२१) यास ताब्यात घेतले. दरम्यान, आज परळी न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने येत्या ९ मार्चपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अविनाशसाेबत आलेल्या त्या युवतीचा परळी शहर पोलिस शोध घेत आहेत. मृत मुलीच्या कुटुंबातील व्यक्तींचे कॉल रेकॉर्ड व अन्य पुरावे आपल्या हाती यावेत यासाठी या प्रकरणात मृत मुलीच्या आई-वडिलांवर आरोप करणाऱ्या नात्यातील महिलेनेच मोबाइल पळवण्यासाठी सांगितले नसेल ना, यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत. लवकरच याबाबतचे सत्य समोर येईल, असे सूत्रांनी सांगितले आहे.
आत्महत्या प्रकरणावर बोलायचे म्हणून बोलावले व हिसकावला मोबाइल
मृत मुलीच्या लहान बहिणीस ४ मार्च रोजी सायंकाळी घराबाहेर बोलावून आत्महत्या प्रकरणावर काही बोलायचे असून फाउंडेशन शाळेसमोर ये, असे मामेभावाने सांगितले. ती मुलगी एका मित्रासोबत तेथे गेली तेव्हा तिला शाळेच्या दुसऱ्या गेटकडे बोलावून घेतले. दुचाकीवर एका युवतीसोबत आलेल्या युवकाने मोबाइल हिसकावून पळ काढला.
एक वर्ष आधी अविनाशविरुद्ध बलात्काराची परळीत तक्रार दाखल
मोबाइल चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी अविनाश राजू राठोडला अटक केली. तो मृत तरुणीचा मामेभाऊ आहे. अविनाशने ज्या मुलीचा मोबाइल हिसकावला तिच्यासोबत त्याच्या विवाहाची बोलणी सुरू होती, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, अविनाश राठोड याने बलात्कार केल्याची तक्रार एक वर्षापूर्वी परळी शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.