आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूर कृत्य:तुझ्या नवऱ्याच्या डोक्यात दगड घातले; मुलाचा शेतात झोपलेल्या जन्मदात्या बापावर दगड घालून जीवघेणा हल्ला

माजलगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतात रात्री झोपी गेलेल्या बापाच्या डोक्यात दगड व लोखंडी बकेट मारून जीवघेणा हल्ला केला. यानंतर गावाकडे परत निघालेल्या मुलाने वाटेत जेवणाचा डबा घेऊन शेतात येणाऱ्या आईला भेटत ‘तुझ्या नवऱ्याच्या डोक्यात दगड घातलेत, तो जिवंत आहे का मेला बघ अन् घेऊन ये,’असे म्हणून तो फरार झाला. ही घटना तालखेड (ता. माजलगाव) गावात रविवारी (५ जून) सायंकाळी घडली. याप्रकरणी आईच्या तक्रारीवरून मुलावर माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शाहू पिराजी शिंदे (७४, रा. तालखेड) असे जखमी झालेल्या वृद्ध पित्याचे नाव आहे. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या पित्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तालखेड येथील शाहू शिंदेंना चार मुले असून ते सर्वजण कामानिमित्त मुंबईत राहतात. त्यांचा सर्वांत लहान मुलगा संतोष शिंदे हा मागील आठवड्यात मुंबईहून गावी तालखेडला आला होता.

रविवारी सायंकाळी वडील शाहू शिंदे हे नेहमीप्रमाणे शेतात झोपण्यासाठी गेले होते. वडिलांवर हल्ला करण्यासाठी त्यांचा मुलगा संतोष शेतात गेला होता. शेतात वडील झोपी गेल्याचे पाहून संतोषने त्यांच्या डोक्यात दगड घातला, त्यानंतर लोखंडी बकेटही डोक्यात मारून जखमी केले. यानंतर संतोष गावाकडे परत निघाला. तेवढ्यात वाटेत वडिलांचा जेवणाचा डब्बा घेऊन येत असलेली त्याची आई दिसली. तेव्हा त्याने ‘तुझ्या नवऱ्याच्या डोक्यात दगड घातलेत, तो जिवंत आहे का मेला बघ अन् घेऊन ये,’ असे म्हणून फरार झाला. हे ऐकून आईच्या काळजाचा थरकाप उडाला होता.

जखमी वडिलाला औरंगाबादच्या घाटीत हलवले
सायंकाळचा जेवणाचा डबा घेऊन शेतात जात असलेल्या राजूबाई शिंदेंनी त्यांच्या नातवाला बरोबर घेऊन घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा शेतातील एका झाडाखाली शाहू शिंदे जखमी अवस्थेत पडलेले होते. ग्रामस्थ व शेजारच्या शेतकऱ्यांच्या मदतीने राजूबाईंनी पतीला सुरुवातीला बीडच्या शासकीय रुग्णालयात नेले. बीड जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर शाहू शिंदे यांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलवले. दरम्यान, शिंदे यांची इतर मुले घाटी दवाखान्यात पोहोचली आहेत.

आईच्या तक्रारीवरून मुलावर पोलिसांत गुन्हा दाखल
राजूबाई शिंदे यांनी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात मुलगा संतोष शिंदेंच्या विरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून वडिलांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.

जीवघेण्या हल्ल्याचे कारण अस्पष्ट
तालखेड येथे शाहू शिंदेंना तीन एकर जमीन असून त्यांची चारही मुले मुंबईत असतात. ही घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली हे पोलिसांना सांगता आले नाही. माजलगाव पोलिस याप्रकरणी तपास करत असून राजूबाई शिंदेंचा जबाब घेणार आहेत. आरोपीच्या अटकेसाठी माजलगाव ग्रामीण पोलिसांनी पथके नेमलीत.

बातम्या आणखी आहेत...