आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारमजान ईद. उपवासाच्या माध्यमातून महिनाभर अल्लाहची साधना केल्यानंतर आलेले आनंदाचे पर्व. जिल्ह्यात ठिकठिकाणी ईदचा सण हा आनंद, उत्साहात साजरा करण्यात आला. राजकीय नेतेमंडळींपासून ते सर्वसामान्य नागरिकांनी ईदच्या या पर्वात सहभागी होत मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यासह मुस्लीम बांधवांनीही ईदची दुआ करताना सर्वांना सुख समाधाना मिळण्यासह सलोख्यात वाढ व्हावी, अशी दुआ अल्लाहकडे मागितली.
परळी येथे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ईदगाह येथे सामुदायिक नमाज पठण झाल्यानंतर मुस्लीम समाज बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते. गेवराई येथे रमजान ईदच्या निमित्ताने मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास शहरातील इदगाह मैदान व संजय नगर येथील दारलुम येथे सामुहिक नमाज अदा करण्यात आली. यावेळी लोकप्रतिनिधी सह शहरातील विविध समाज बांधवांनी शुभेच्छा दिल्या.
मोंढा भागातील इदगाह मैदानावर व संजय नगर येथील दारलुम येथे शहरातील मुस्लिम बांधवांनी सामुहिक नमाज अदा करण्यात आली. दरम्यान यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित, बदामराव पंडित, विजयसिंह पंडित, युद्धजित पंडित, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, तहसीलदार सचिन खाडे, पोलीस निरीक्षक रविंद्र पेरगुलवार, शिवराज पवार यांच्यासह शहरातील विविध समाजबांधव, व्यापारी, पत्रकार, वकील, प्राध्यापक यांनी शुभेच्छा देत मुस्लीम बांधवांचा आनंद द्विगुणित केला. माजलगाव येथे मंजरथ रोडवरील ईदगाह तसेच ईदगाह मोहल्ला याठिकाणी ईदगाहवर सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. पाटोदा शहरातील ईदगाहवर सामुदायिक नमाज पठणानंतर सर्व पक्षीय नेतेमंडळींनी उपस्थित राहून गुलाब पुष्प देत मुस्लीम बांधवांचे स्वागत केले. आष्टी येथे आमदार सुरेश धस मित्रमंडळाच्या वतीने ईद उत्साहात साजरी करण्यात आली. आमदार धस हे स्वत: याठिकाणी हजर होते. यासह वडवणी, केज, अंबाजोगाईतील ईदगाह व मस्जिद याठिकाणी सामुदायिक नमाज पठणासह अल्लाहकडे दुआ मागण्यात आली.
बर्दापूर येथे तीन गावांतील बांधवांनी केले नमाज पठण
बर्दापुर येथील ईदगाह येथे नमाज पठण करत ईद साजरी करण्यात आली. लिंबगाव, हातोला या गावातील मुस्लिम बांधवही याठिकाणी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, ग्रा.पं.सदस्य विलास मोरे, सरपंच सुधाकर शिनगारे, पोलीस निरीक्षक अशोक खरात, तलाठी गायकवाड उपसरपंच बबलू शेख यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
संत-महतांचा सन्मान करत बीड येथे अनोखी ईद
बीड येथील श्री क्षेत्र नारायण गड, राम गड आणि बंकट स्वामी संस्थानच्या महंतांनी मुस्लीम बांधवांबरोबर ईद साजरी केली. मुस्लिम बांधवांनी देखील महंतांचा सन्मान करून अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्यात. सध्या भोंग्याचं राजकारण सुरू असताना देशासह राज्यात सामाजिक एकता राहिली पाहिजे. दुसऱ्यांच्या आनंदात आपला आनंद पाहिला पाहिजे, असा संदेश महंतांनी दिला.
माणूस आनंदात राहावा, अशी मागितली दुआ
महिन्याभराच्या कडक रोज्यानंतर ईदच्या दिवशी जिल्हाभरात मुस्लीम समाज बांधवांनी एकत्र येत नमाज पठण केले. माणूस प्राणी हा गुण्यागोविंदाने राहावा, सर्वांना सु:ख, समृध्दी मिळावी, सलोख्याचे वातावरण अबाधित राहावे, अशी दुआ मागण्यात आल्याचे मौलाना अब्दुल बाखी यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.