आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिला अत्याचाराच्या प्रकरणात बदनामीच्या भीतीपाेटी किंवा कुणाच्या तरी दबावाखाली येऊन पीडिता तक्रार देण्यासाठी धजावत नाहीत, त्यामुळे अनेक नराधम कायद्याच्या कचाट्यातून सुटून उजळ माथ्याने समाजात फिरतात. पुन्हा असे गुन्हे करायलाही माेकाट राहतात. बीडमधील एका अल्पवयीन पीडितेने मात्र मूकबधिर असूनही ‘माैन’ साेडून अापल्यावरील अत्याचाराचा पाढा दुभाष्याच्या मदतीने न्यायालयासमाेर वाचला. त्यामुळे एका नराधमाला २० वर्षे तुरुंगात खडी फाेडायला पाठवणे शक्य झाले. अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्या. नाझिया शेख यांनी हा निकाल दिला.
पुणे येथील एका सेवाभावी संस्थेमध्ये दाखल असलेली एक १६ वर्षीय व जन्मत: मतिमंद असलेली मुलगी गरोदर असल्याची तक्रार तेथील अधीक्षकांनी ९ जानेवारी २०१८ रोजी पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल केली हाेती. ही पीडित मुलगी बीड तालुक्यात आपल्या गावी असताना अाराेपीने असहायतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. पुणे पाेलिसांनी तिचा जबाब नोंदवून प्रकरण बीड ग्रामीण ठाण्याकडे वर्ग केले. अाराेपीवर पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी केला. पीडितेच्या गावात सालगडी म्हणून काम करणाऱ्या तुकाराम ज्ञानदेव कुडूक (३२, रा. तिंतरवणी, ता. शिरूर) यानेच अत्याचार केल्याचे समाेर अाले. त्याला अटकही करण्यात अाली. सबळ पुरावे हाती लागल्याने बल्लाळ यांनी अाराेपीविराेधात बीडच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्या. नाझिया शेख यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अजय राख यांनी काम पाहिले. या प्रकरणात ९ साक्षीदार तपासण्यात अाले. तपास अधिकारी म्हणून सहायक फौजदार एन. वाय. धनवडे यांनी पाहिले.
‘करपल्लवी’च्या मदतीने कळल्या भावना
पीडिता मूकबधिर असल्याने अापली व्यथा न्यायालयासमाेर मांडणे तिच्यासाठी अाव्हानात्मक हाेते. मग न्यायालयाच्या परवानगीने बीडमधील मूकबधिर शाळेतील शिक्षकांची मदत घेण्यात अाली. बाेटांच्या साह्याने खाणाखुणा करण्याच्या ‘करपल्लवी’ या सांकेतिक भाषेचा वापर करून पीडितेने अापबीती कथन केली. ती शिक्षकांनी न्यायालयास सांगितली. काेर्टात हजर अाराेपीकडे बाेट दाखवून याच नराधमाने अापल्यावर अत्याचार केल्याचेही तिने न्यायाधीशांना सांगितले. अखेर दाेन्ही बाजूंचे युक्तिवाद एेकल्यानंतर न्यायालयाने आरोपी तुकाराम कुडूक याला २० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
दिव्य मराठी भूमिका
माैन साेडू, चला बाेलू
माणुसकीला काळिमा फासत अत्याचार करणाऱ्या नराधमांना धडा शिकवायचा असेल, तर पीडित महिलांनी किंवा असे प्रकार पाहणाऱ्यांनी अशा प्रवृत्तींविराेधात अावाज उठवण्याची गरज अाहे. यासाठी दैनिक दिव्य मराठीने ‘माैन साेडू, चला बाेलू’ हे अभियान रातरागिणींसाेबत सुरू केले अाहे. अाैरंगाबाद जिल्ह्यातील दाेन पीडितांनी जवळच्या व्यक्तींकडून हाेणाऱ्या अत्याचारांची पाेलिसात तक्रार करण्याचे धाडस दाखवले हाेते. कुठलीही भीडभाड न ठेवता यंत्रणेकडे न्याय मागण्यासाठी महिलांनी पुढे येण्याची तयारी दाखवली, तरच अशा रानटी प्रवृत्तींचा संसर्ग राेखणे शक्य हाेणार अाहे. या पार्श्वभूमीवर बीडमधील रातरागिणीने दाखवलेले धाडस खराेखरच काैतुकास्पद अाहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.