आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी थांबेल ‘ती’ची अवहेलना:आठ महिन्यांमध्ये 98 बलात्काराच्या घटना, 268 विनयभंगाचे गुन्हे दाखल; बाललैंगिक अत्याचाराची स्थिती चिंताजनक

बीड2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गतवर्षीच्या तुलनेत बीड जिल्ह्यात अशा गुन्हेगारीची वाढ

देशाची राजधानी दिल्लीत महिला पोलिसावर झालेला अमानुष बलात्कार व हत्येपाठोपाठ महाराष्ट्राची राजधानी मुंबईच्या साकीनाका परिसरात झालेला बलात्कार आणि हत्येच्या घटनेने देश सुन्न झाला आहे. जिल्ह्यातही गतवर्षीच्या तुलनेत यंदा महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत बलात्काराच्या ९८ घटना घडल्या, तर २६८ विनयभंगाचे गुन्हे नोंद झाले अाहेत. मागील काही महिन्यांत जिल्ह्यात बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेली वाढही चिंताजनक आहे. मागील आठवड्यात केज तालुक्यात युवतीवर बलात्कार करून तिला विहिरीत ढकलून दिल्याची गंभीर घटना घडली होती, तर त्याआधी पाटोदा तालुक्यातील चुंभळी येथे सततच्या छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली होती.

बीड व माजलगाव तालुक्यातही अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडल्या होत्या. दरम्यान, गतवर्षी जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या काळात जिल्ह्यात बलात्काराचे ७७, तर विनयभंगाचे २०८ गुन्हे नोंद झाले होते. यंदा सन २०२१ मध्ये याच कालावधीत बलात्काराचे ९८, तर विनयभंगाचे २६८ गुन्हे नोंद झाले आहेत. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत महिला अत्याचारांच्या ८१ घटना अधिक नोंदवल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

शिक्षेचे प्रमाण कमी
सर्व गुन्ह्यांत आरोपींना शिक्षा होण्याचे जिल्ह्याचे प्रमाण सध्या सुमारे २० टक्के आहे. मात्र, बलात्कार, विनयभंग, बाललैंगिक अत्याचार किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत शिक्षा होण्याचे प्रमाण कमी आहे.

पिंक पथक, दुचाकी गस्त
जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहून बीड पोलिसांनी प्रत्येक पोलिस ठाण्यात पिंक पथकांची स्थापना केली असून पथकांना वाहन दिलेले आहे. शिवाय, गर्दीची ठिकाणे, कोचिंग क्लासेस परिसर अशी सुमारे दीड हजारे ठिकाणे निश्चित करून तिथे बाइक पेट्रोलिंगही सुरू करण्यात आली आहे. यासाठी सुबाहू अॅपही तयार केले आहे. - आर. राजा, पोलिस अधीक्षक, बीड.

बाललैंगिक अत्याचारांच्या ७० घटना
जिल्ह्यात बाललैंगिक अत्याचाराचा मुद्दाही गंभीर झाला आहे. आठ महिन्यांत बाललैंगिक अत्याचाराच्या सुमारे ७० घटना नोंद केल्यात. यात बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

एक महिन्यामध्ये छळाच्या ५८ तक्रारी
जिल्ह्यात विवाहितांचा छळ होण्याचे प्रमाणही वाढले आहे. ऑगस्ट या एकाच महिन्यात छळाचे ५८ गुन्हे जिल्ह्यात नोंद झाले आहेत.

शक्ती कायदा तत्काळ करा
बलात्कारांच्या घटना रोखण्यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता आहे. प्रस्तावित शक्ती कायदा तत्काळ करावा. बलात्काराची सर्व प्रकरणे जलदगती न्यायालयात चालवावीत. त्यामुळे शिक्षेचे प्रमाण वाढेल व अशा घटनांना काही अंशी चाप बसेल. - मनीषा तोकले, सामाजिक कार्यकर्त्या, बीड.

महिला अत्याचारात शिक्षेचे प्रमाण कमी का?
बलात्कारासारख्या घटनांत शिक्षा होते, मात्र प्रकरणे अनेक वर्षे चालतात. विनयभंग किंवा घरगुती हिंसाचाराच्या घटनांत साक्षीदार-पंच फितूर होतात, कधी आपसात समेट घडतो यामुळे शिक्षा होण्याचे प्रमाण कमी आहे.

अत्याचाराबाबत कुठे तक्रार करता येईल?
कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होत असेल तर कामगार महिला विशाखा समितीकडे तक्रार करू शकतील. महिला, अल्पवयीन मुलींची छेड काढली जात असेल किंवा लैंगिक छळ केला जात असेल तर त्या जवळच्या पोलिस ठाण्यात दाद मागू शकतात.

संकटात तातडीने कशी मागता येईल मदत?
संकटात सापडताच तातडीने पोलिस नियंत्रण कक्षाचा १०० क्रमांक किंवा ११२ या क्रमांकावरही फोन करून मदत मागता येईल किंवा महिला हेल्पलाइन १०९८ आणि चाइल्डलाइन हेल्पलाइन १०९८ या क्रमांकावरही मदतीसाठी फोन केल्यास मदत मिळते.

बातम्या आणखी आहेत...