आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आध्यात्मिक:श्रीक्षेत्र रामगडावर दर्शनासाठी रीघ, 41 फुटांच्या ध्वजस्तंभाचे अनावरण; स्वामी योगीराज महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने नारळी सप्ताहाची सांगता

बीडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षाच्या कोरोनानंतर श्रीराम जन्मोेत्सवानिमित्त श्री क्षेत्र रामगड येथील यात्रेत हजारोंच्या संख्येने रामभक्तांनी गर्दी केली होती. तसेच ४३ वर्षाची परंपरा असलेला रामगडाचा वार्षिक नारळी अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी श्रीक्षेत्र रामगड येथेच पार पडला. या सप्ताहाची सांगता श्री क्षेत्र रामगडाचे मठाधिपती स्वामी योगीराज महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. या सप्ताहानिमित्त श्री क्षेत्र रामगड येथे ४१ फुटाचा भगवा ध्वज उभारण्यात आला. भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, जि.प.सदस्या रेखा क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष दिलीपराव गोरे, सीए बी.बी.जाधव, बळीराम गवते, अंबादास जाधव, जयसिंग चुंगडे, गोरख सिंघण, अ‍ॅड.महादेव तुपे, अरुण डाके, संजय जाहेर पाटील, गणेश उगले, सखाराम मस्के, शरद दुगड, रामा बांड, प्रमोद रामदासी, प्रल्हाद धनगुडे, कल्याण पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या सप्ताहातील काल्याच्या कीर्तनामध्ये महंत स्वामी योगीराज महाराज यांनी संत तुकाराम महाराज यांच्या ‘कंठी धरीला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश, काला वाटू एकमेका, वैष्णव निका संभ्रम वाकुलिया ब्रम्हदिकां, उत्तम लोका दाखवूं तुका म्हणे भूमंडळी, आम्ही बळी वीर गाढे’ या अभंगावर चिंतन मांडले.

साक्षात प्रभू रामचंद्र व सीतामाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली श्री क्षेत्र रामगड ही भूमी आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे भक्ताला देवाचा भाव समजला पाहिजे. तो भाव येथील भक्तांना समजला आहे. गडाच्या विकासासाठी सर्वच क्षेत्रातून मदत मिळत असल्याचेही योगीराज महाराज यांनी सांगितले. यावेळी गायणाचार्य राजेंद्र महाराज सावंत, सदाशिव महाराज झनझने, मसुराम महाराज कदम, सिद्धेश्वर महाराज बागलाने, चिंतामन महाराज मोरे, बाळू महाराज मोरे, गोकुळ महाराज उबाळे यांच्यासह मृदंगाचार्य रमेश महाराज पिसाळ, प्रमोद महाराज पदमुले, गणेश महाराज आमटे, रघुराम महाराज ढोबळे यांनी साथसंगत केली. तसेच श्री क्षेत्र रामगड परिसरातील टाळकरी मंडळी यांची उपस्थिती होती. शेवटी काल्याच्या अभंग म्हणून दही हंडी फोडून महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी हजारोच्या पंगतीमध्ये बुंदी आणि लाही चिवड्याचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. या महाप्रसादाचे आयोजन द कुटे ग्रुपच्यावतीने करण्यात आले होते. दरम्यान, गडाचा ५० वा नारळी सप्ताह बीड तालुक्यातील रुई शहाजानपुर येथे होणार आहे. रूई ग्रामस्थांनी उत्साही वातावरणामध्ये हे नारळ स्विकारले.

सप्ताहस्थळी आयोजित आरोग्य शिबिरास प्रतिसाद
श्री क्षेत्र रामगड येथे सप्ताहासाठी आलेल्या रामभक्तांच्या मोफत आरोग्य तपासणीसाठी अंबादास जाधव यांनी आरोग्य शिबिर आयोजित केले होते. या शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. डॉ.रोहिणी जाधव, डॉ.मनोज लांडगे, डॉ.मोहिनी जाधव, डॉ.प्रशांत सानप, डॉ.संजय कदम, डॉ.भावले, डॉ.जाधव डॉ.के.बी.पैठणकर यांनी शिबिरात सहभागी होत तपासणी केली.