आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्यायकारी प्रथा:विधवा प्रथा बंद करण्यासाठी आडस येथील ग्रामपंचायतीचा ठराव मंजूर

केज4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधवा महिलांचे आनंद व स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या प्रथा गावात बंद करण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य तथा लोक कल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव शिवरुद्र आकुसकर यांनी केली. तसा ठराव आडस (ता. केज) ग्रामपंचायतीने सरपंच बालासाहेब ढोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत घेतला. जिल्ह्यातील असा ठराव घेणारी पहिली ग्रामपंचायत ठरली. यामुळे येथील विधवा प्रथा बंद होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

आपण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. प्रत्येक क्षेत्रात त्या आपली कामगीरी दाखवत आहेत. देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत महिला पोचल्या असताना देखील आजही समाजात काही अनिष्ट विकृत रुढी परंपरा कायम असून, विधवा महिलांवर लादण्यात आलेल्या परंपरा मोडीत निघणं आवश्यक आहे. पती गेलेल्या त्या महिलेच्या दुःखाचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही. तसेच लेकरं संभाळण्याची चिंता ही त्या आईला असते.

परंतु विधवा प्रथेमुळे त्या महिले वर अनेक बंधने येतात. तीच्या भावनेचा विचार न करता तिचे कुंकू पुसले जाते, पायातील जोडवी काढून सुवासिनीची ओळख मिटवून टाकण्यात येते. यामुळे काम निमित्ताने बाहेर पडणाऱ्या विधवांना अपमान सहन करावा लागतो. त्यांना अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येत नाही. किंबहुना त्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते. या परंपरा जबरदस्तीने त्यांच्यावर लादण्यात येतात असे दिसून येते. या विधवा कुप्रथा बंद व्हायला हवी या विचाराने येथील ग्रामपंचायत सदस्य शिवरुद्र आकुसकर यांनी १५ ऑगस्ट रोजी घेण्यात येणाऱ्या ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याची मागणी केली. या वेळी विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव एकमताने पास झाला. असा निर्णय घेणारे बीड जिल्ह्यातील आडस पहिले गाव ठरले आहे. यासाठी गावात समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. या कुप्रत्ये विषयी जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...