आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकरीवर्गाने खते उपलब्धतेबाबत चिंता करू नये. किरकोळ खत विक्रेत्यांनी त्यांची युरिया व डीएपी खतांची मागणी तातडीने तालुका कृषि अधिकारी वा पंचायत समिती कृषि अधिकारी यांच्याकडे नोंदवावी, असे आवाहन राधाबिनोद शर्मा जिल्हाधिकारी यांनी केले.
खतांचा बफर साठा खुला करण्याबाबत तातडीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या बैठकीत पेरणीच्या वेळी डीएपी या खतांची जास्त मागणी असल्याने त्यातील ७० टक्के म्हणजे १४८५ मेट्रिक टन साठा खुला करण्यास मान्यता देण्यात आली. यापुढेही गरजेनुसार उर्वरित साठा खुला करण्यात येईल. याशिवाय घरच्या घरी मिश्र खते तयार करण्यासाठी युरियाची आवश्यकता असते. हे पाहून ३० टक्के म्हणजे १०१० मेट्रिक टन साठा खुला करण्यात आला. हा मुक्त केलेला साठा साधारणतः २५० ट्रक म्हणजेच एका रेल्वे रेक एवढा आहे. पिके खुरपणीस आल्यावर युरियाची अधिक गरज भासते, त्यावेळी आवश्यक संरक्षित बफरसाठा जिल्हा प्रशासन खुला करेल.
ऐन हंगामात पुरवठ्याच्या अडचणीमुळे खताची टंचाई भासू नये, म्हणून जिल्ह्यात रासायनिक खतांचा संरक्षित साठा करण्यात येतो. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली असा साठा निर्माण करण्यात बीड जिल्हा राज्यात अन्य जिल्ह्यापेक्षा अग्रेसर राहिला. तालुका स्तरावर तालुका कृषि अधिकारी व पंचायत समिती कृषि अधिकारी हे समन्वय साधून ज्या भागात खताची टंचाई निर्माण होऊ शकते, अशा भागात खतपुरवठा करण्याबाबत विक्रेतेनिहाय साठा खुला करतील. सदर साठा सध्या कृषि उद्योग विकास महामंडळ यांच्या जिल्ह्यातील ३२ ठिकाणी असलेल्या गोदामात उपलब्ध आहे. ज्या खत विक्रेत्यांकडे घाऊक व किरकोळ असे दोन्ही परवाने आहेत, त्यांना हा साठा दिला जाणार नाही. केवळ कार्यरत किरकोळ खत विक्रेत्यांना अधिकतम ५ टन युरिया व ५ टन डीएपी असा पुरवठा तालुका समितीच्या यादीप्रमाणे महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ यांच्यामार्फत केला जाईल.
संरक्षित साठा टप्प्याटप्प्याने खुला केला जाईल
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी खरीपपूर्व तयारी आढावा बैठकीत गतवर्षीपेक्षा सुमारे दहा टक्के अधिक संरक्षित साठा यावर्षी निर्माण करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले होते. त्यात ८० टक्के साठा हा तालुकानिहाय पेरणी क्षेत्राप्रमाणे व २० टक्के साठा हा रेल्वे रेक पॉईंटच्या अडचणींच्या तालुक्यासाठी व तोही पेरणी क्षेत्रानुसार असे निकष ठेवण्यात आले. त्यानुसार बीड जिल्ह्यात डीएपी व युरिया या खतांचा आवश्यक संरक्षित साठा करण्यात आला. बाजारातील उपलब्धता व पुरवठा या बाबी विचारात घेऊन शेतकरी वर्गास ऐन पेरणीच्या वेळी खतांची टंचाई भासू नये यासाठी जिल्हा प्रशासन वेळोवेळी खत उपलब्धतेबाबत आढावा घेऊन संरक्षित साठा टप्प्याटप्प्याने खुला करते.
शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या बचतीसाठी बियाण्यास जैविक खतांची बीज प्रक्रिया करावी सध्या जिल्ह्यात सर्वदूर पेरणी लायक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाने पेरणीची घाई करू नये. साधारणतः ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाला व जमिनीत साधारणतः सहा इंच ओल झाली त्यानंतरच पेरणी करावी. रासायनिक खतांचा अति वा अयोग्य वापर जमिनीचे आरोग्यासाठी चांगला नसतो. तेव्हा रासायनिक खते वापर करण्यापूर्वी जमिनीत पुरेशा प्रमाणात सेंद्रीय खतांचा वापर करावा. रासायनिक खतांचा बेसल डोस ठरवताना माती परीक्षण अहवाल अथवा गावचा जमीन सुपीकता निर्देशांक यांचा वापर करून तो डोस पेरणी वेळी द्यावा. बियाणास जैविक खतांची बीज प्रक्रिया करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.