आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआरटीईनुसार आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी चाैथी फेरी सध्या सुरू असून प्रवेशासाठी २७ जुलै ही मुदत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ६३६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्याची माहिती शिक्षण विभाग व आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिली.
आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी, परित्यक्ता, विधवा महिलांची मुले यांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणे खासगी इंग्रजी शाळेत शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी इंग्रजी शाळांमध्ये एकूण जागांच्या २५ टक्के जागा या राखीव ठेवण्यात येतात. या जागांवर आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. जिल्ह्यात यंदा आरटीईनुसार नोंदणीकृत २२७ शाळा असून त्यामध्ये १ हजार ९०८ जागा उपलब्ध आहेत. या जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवले होते. जिल्ह्यात आरटीईबाबत झालेल्या जनजागृतीचा परिणाम म्हणून उपलब्ध जागांच्या पाचपट म्हणजे ४ हजार ९५२ म्हणजेच सुमारे ५ हजार अर्ज आले होते.
राज्यस्तरावरून लॉटरी पद्धतीने सुरुवातीला प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जातेय. आतापर्यंत तीन फेऱ्या पूर्ण झाल्या असून सध्या प्रवेशाची चौथी फेरी सुरू आहे. २२ ते २७ जुलैपर्यंत चौथ्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. त्यामुळे चौथ्या फेरीतील प्रवेशनिश्चितीसाठी आता शेवटचे २ दिवस शिल्लक राहिलेत. आतापर्यंत जिल्ह्यात १ हजार ६३६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेत. जिल्ह्यात अद्याप १९४ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत होते.
अशी झाली प्रवेश प्रक्रिया
मूळ निवड यादीतील प्रवेश १३३७
पहिल्या यादीतील प्रवेश २१५
दुसऱ्या यादीतील प्रवेश ६८
तिसऱ्या यादीतील प्रवेश १६
प्रवेश पूर्ण करावा
चौथ्या टप्प्यातील प्रतीक्षा यादीतील प्रवेशांमुळे या संख्येत भर पडून अधिक गरजू व दुर्बल घटकांतील गोरगरीब विद्यार्थी या प्रक्रियेतून शिक्षण घेऊ शकतील. या विद्यार्थ्यांनी २७ जुलैपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेशनिश्चिती करण्याचे आवाहन मनोज जाधव यांच्याकडून केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.