आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इथंच गेला...:सायेब, बहीण इथंच बाळंतीण झाली, डेंग्यूने मुलगा अन् बापही इथंच गेला...

अमोल मुळे | बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘सायेब, आधी माझी बहीण, मग भावजयी या दोघी इथंच वट्यावर बाळंतीण झाल्या तवा बी कुणी आलं न्हाई..उपोषण करताना डेंग्यूने दीड वर्षाचं लेकरू गेलं अन् आज बापही इथंच मेला.. शासनाने घरकुल दिलं, दोन हप्ते बी मिळालं. पीटीआर असूनही सायेब लोकं घर बांधू देत नाहीत. दुसऱ्या गावाला जा सांगतात..दुसऱ्या गावचे लोक आम्ही पारध्याचे म्हणून येऊ देईनात. २ वरीस आंदोलनात गेले. डोस्क्यावरच्या छपरासाठी आज बाप नावाचं छप्परच हरवलं बघा..’ वडील अप्पा राव यांच्या मृत्यूनंतर धायमोकलून रडणारे बाबाराव पवार यांनी दिव्य मराठीशी बोलताना कैफियत मांडली.

बीड तालुक्यातील वासनवाडीत गाय रानावर पारधी समाजाच्या बाबाराव अप्पाराव पवार यांच्यासह ४ ते पाच कुटुंब २००७ वास्तव्यास आहेत. त्यांचे वडील अप्पाराव आणि आई कविता यांच्या कुटुंबासाठी एक, बाबारावच्या कुटुंबासाठी एक आणि गणेश पवार व अन्य एका कुटुंबासाठी एक अशी एकूण ४ घरकुले २०२० मध्ये शासनाच्या शबरी योजनेतून त्यांना मंजूर झाली आहेत. त्यांना १५ हजार रुपयांचे प्रत्येकी दोन हप्तेही मिळाले आहेत. पवार कुटुंबाकडे या जागांचे पीटीआर असल्याचे ते सांगतात. त्यांनी या जागेवर घरकुल बांधू नये म्हणून तलाठी आणि गिरधारवर यांनी रोखल्याची त्यांनी तक्रार आहे. घर बांधू द्यावे किंवा दुसरी जागा द्यावी म्हणून दाेन वर्षांपासून या ४ कुटुंबाचा बीड जिल्हा प्रशासनाबरोबर संघर्ष सुरू आहे. जिल्हाधिकारी ते विभागीय आयुक्त कार्यालय अशी अनेकदा उपोषण, निवेदन देऊनही काही झाले नाही. १ डिसेंबरपासून त्यांनी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. रविवारी पहाटे यातील अप्पाराव पवार (६०) यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ओट्यावर उपोषणाने मृत्यू झाला.

मृतदेह रुग्णालयातील शीतगृहात ठेवला
दरम्यान, प्रश्न मार्गी लागेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्यावर पवार कुटुंब ठाम आहे. दरम्यान, अप्पाराव पवार यांचा मृतदेह बीड जिल्हा रुग्णालयातील शीतगृहात ठेवण्यात आलेला असून आज सोमवारी त्यांची जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यामध्ये समाधानकारक निर्णय झाला तरच मृतदेह ताब्यात घेऊ अशी भूमिका पवार कुटुंबाची आहे, अशी माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पीआय केतन राठोड यांनी दिली.

आजारपणाने मृत्यू
अप्पाराव पवार हे काही दिवसांपासून आजारी होते. याच आजारपणाने त्यांचा मृत्यू झाल्याचा शवविच्छेदन अहवाल जिल्हा रुग्णालयाने पोलिसांना दिला आहे.

आरडीसी, एसपींकडून समजूत
दरम्यान, अप्पाराव पवार यांच्या मृत्यूनंतर काही नागरिकांनी पोलिस व प्रशासनाला याची माहिती दिली. त्यानंतर शिवाजीनगर ठाण्याचे पीआय केतन राठोड हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणस्थळी आले. मात्र, मृतदेह हलवण्यास पवार कुटुंब तयार होईना. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांनी या कुटुंबाची भेट घेत सोमवारी बैठक घेऊन विषय मार्गी लावू असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला गेला.

सामाजिक कार्यकर्त्यांची धाव
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले, अशोक तांगडे, तत्त्व ल कांबळे, डॉ. गणेश ढवळे व इतरांनी घटनास्थळी धाव घेत या कुटुंबाला धीर दिला. त्यांच्या वतीने त्यांची बाजू प्रशासनासमोर मांडली. पारधी कुटुंबाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

दोषींवर गुन्हे दाखल करा
मंजूर असलेल्या घरकुलाला जागा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी अप्पाराव पवार यांचा उपोषणस्थळी मृत्यू झाला ही घटना गंभीर असून या प्रकरणातील दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, पवार कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपाईं आंदोलन करेल असा इशारा जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...