आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेहू येथील संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात औरंगपूर (ता. केज) येथील श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थानच्या दिंडीला मानाचे स्थान आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा वारकऱ्यांत उत्साह दिसून येत असून या दिंडीत शेकडो वारकरी सहभागी झाले आहेत.
आषाढी एकादशीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पंढरपूरच्या वारीला जातात. केज तालुक्यातील तीर्थक्षेत्र, संस्थानसह अनेक गावांतून भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी खांद्यावर भगवी पताका, हातात टाळ घेऊन पायी चालत पंढरपूरला जातात. १० वर्षांपूर्वी औरंगपूर येथे स्थापन केलेल्या संत तुकोबाराय पावनधाम संस्थानचे संस्थापक अध्यक्ष महादेव महाराज बोराडेंसह संस्थानचे विद्यार्थी तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातून श्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र पंढरपूर अशी पायी वारी करत आहेत.
यापूर्वी महादेव महाराज बोराडे हे १७ वर्षे माउलींच्या पालखी सोहळ्यातून दिंडीत जात होते. दिंडीत कीर्तन, भजन, दिंडी प्रमुख या नात्याने वारकऱ्यांची सेवाही करत होते. त्यांचे वडील विष्णुदास गुंडिबा बोराडे यांनी पंढरीच्या वारीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून मागच्या वर्षीपासून एकटेच पायी वारीला जाताहेत. केज तालुक्यातील पावनधामची ही दिंडी आकुर्डी, पुणे, लोणी काळभोर, यवत, वरवंड, उंडवडी (गवळ्याची), बारामती, सणसर, अंथुर्णे, निमगाव केतकी, इंदापूर, सराटी, अकलूज, बोरगाव, कुरोली, वाखरी असा मुक्काम करत पंढरपूरला रवाना होत आहे.
दोन वर्षांच्या खंडानंतर उत्साह
^मागील तीन दशकांपासून दरवर्षी न चुकता आषाढी वारी आळंदी, देहू ते पंढरपूर अशी केली. दोन वर्षे कोरोना संकटामुळे वारीला परवानगी नव्हती. यंदा वारीला जाता येत असल्याने उत्साह आहे. - महादेव महाराज बोराडे, संस्थापक अध्यक्ष, श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्था, औरंगपूर.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.