आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंसाराच्या रहाटगाड्यात मानवी गरजा भागवतांना माणूस कधीच समाधानी राहत नाही. माणसांची हाव व अपेक्षा त्यांना कधीच सुखी व समाधानी करु शकत नाही. त्यामुळे मानवी देहाला परमार्थाच्या माध्यमातून समाधान देण्याचं काम संतांनी केलं. संत कधीच देव दाखवत नाहीत तर देवाकडे जाणारा भक्तीचा मार्ग दाखवतात असे प्रतिपादन नगद नारायण गडाचे मठाधिपती प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांनी केले. ते रांजणी येथील अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तनसेवेचे सहावे पुष्प गुंफताना बोलत होते.
गेवरार्इ तालुक्यातील रांजणी येथे ३२ वा अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहे. या सप्ताहात शुक्रवारी (दि.१) महंत प्रेममुर्ती मठाधिपती शिवाजी महाराजांची किर्तनसेवा संपन्न झाली. यावेळी शिवाजी महाराजांनी संत नामदेव महाराजांच्या संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखे नाही तेथे, साधु थोर जाणा, साधु थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगे, इहलोकीं तोचि सर्वाभुतीम सम, शरीराचा भ्रम नेणे कदा, नामा म्हणे गाय दुध एक सारे, साधु निरंतर वर्ते तैसा.. या अभंगाचे निरुपण केले.
यावेळी शिवाजी महाराज म्हणाले की, आज संसार करतांना परमार्थाची गोडी लावणं गरजेचं झालं आहे. पैसा आला की भोग वाढतात अन् भोग वाढल्यामुळे रोग वाढतात. त्यामुळे अमर्याद पैसा येत असतांना त्यातून भोगवादी संस्कृतीला वाढू द्यायचे नसेल तर संतांची संगत महत्वाची आहे. मानवी मनाला मार्यादेत ठेवण्याचं काम परमार्थ करतो. संतांच्या संगतीत आले म्हणजे तुम्हाला देव मिळेल असं नाही. संत देव दाखवू शकत नाहीत तर मानवाला देवाकडे घेवून जाणारा भक्तीचा मार्ग संत दाखवतात. आज पैसा कमवणाऱ्या पिढीपेक्षा सुसंस्कृत असलेली पिढी घडवणं जास्त गरजेचं झालं आहे. ग्रामीण भागातील लोकांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यावर भर देणं गरजेचं आहे.
कारण शिक्षणातच चांगला माणूस व चांगला समाज घडवण्याचं सामर्थ्य आहे. तुम्ही तुमच्या मुलांसाठी किती पैसा कमवून ठेवला यापेक्षा तुम्ही त्याच्या शिक्षणावर किती खर्च केला याला जास्त महत्व आहे. वेळ प्रसंगी मुलांच्या शिक्षणासाठी जमिनी विकायची वेळ आली तरी मागे पुढे पाहू नका पण त्यांना चांगले शिक्षण द्या असे आवाहनही शिवाजी महाराजांनी केले. यावेळी नामदेव महाराज शेकटेकर यांच्यासह पंचक्रोशितील भाविक भक्त व रांजणी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.