आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंपाउंडरचा प्रताप:रेमडेसिविरच्या रिकाम्या बाटल्यांत सलाइनचे पाणी भरून करायचा विक्री; पोलिसांनी प्रयत्न हाणून पाडला

बीड9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दत्ता निर्मळने रुग्णालयात वापरलेल्या रेमडेसिविरच्या रिकाम्या बाटल्या, कव्हर जमा करून ठेवले होते.

रेमडेसिविरचा काळा बाजार करताना पकडलेल्या त्रिकूटात कंपाउंडरने शक्कल लढवत रुग्णालयात वापरलेल्या रेमडेसिविरच्या मोकळ्या बाटल्यांत सलाइनचे पाणी भरून तो विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचे पाेलिस तपासात समोर आले. शिवाजीनगर पोलिसांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान, त्याने किती इंजेक्शन विक्री केले याची अद्याप माहिती समोर आली नसली तरी पोलिसांच्या माहितीनुसार पहिल्याच प्रयत्नात त्याचा डाव हाणून पाडला गेला. असे असले तरी हे इंजेक्शन रासायनिक तपासणीसाठी पाठवले आहे.

आठवडाभरापूर्वी शिवाजीनगर पोलिसांनी २२ हजार रुपयांना रेमडेसिविर विक्री करण्याच्या प्रयत्नातील संतोष नाईकवाडे, दत्ता निर्मळ व प्रकाश नागरगोजे यांना अटक केली होती. त्यांच्याकडून दोन इंजेक्शन जप्त केली होती. यातील एक इंजेक्शन झटापटीत फुटले होते. ३ दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर मंगळवारी तिघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. दरम्यान, पोलिसांच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली. दत्ता हा एका खासगी कोविड रुग्णालयात कंपाउंडर होता. तिथे रुग्णांना वापरलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या रिकाम्या व्हायल त्याने जमा केल्या होत्या. त्यात सलाइनचे पाणी इंजेक्शनच्या साहाय्याने भरून त्या व्हायल त्याने ते रेमडेसिविर असल्याचे भासवून मित्रामार्फत २२ हजारांना एक याप्रमाणे विक्री करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्कतेमुळे त्यांचा डाव फसला अन् ते पोलिसंाच्या जाळ्यात अडकले.

अहवालावरून निश्चिती
इंजेक्शनमध्ये सलाइनचे पाणी भरून तेच इंजेक्शन विक्री केले जाणार असल्याची कबुली दत्ता निर्मळने दिली. मात्र, तरीही हे इंजेक्शन तपासणीसाठी मुंबईच्या कलीना येथील प्रयोगशाळेकडे पाठवले. त्याच्या अहवालावरून ते सलाइनचे पाणी आहे की खरच इंजेक्शन याची निश्चिती होईल. अमोल गुरले, सहायक पोलिस निरीक्षक, शिवाजीनगर पोलिस ठाणे

जमा केल्या मोकळ्या बाटल्या अन् खोके
पहिल्याच प्रयत्नात पोलिसांनी या त्रिकुटाला गजाअाड केले. मात्र, ही विक्री सक्सेस झाली तर आणखी विक्री करता यावी, यासाठी दत्ता निर्मळने रुग्णालयात वापरलेल्या रेमडेसिविरच्या रिकाम्या बाटल्या, कव्हर जमा करून ठेवले होते.

बातम्या आणखी आहेत...