आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्तीचे मैदान:आई-वडिलांच्या पाठबळामुळे सानिकाची यशाला गवसणी

महेश बेदरे | पाटोदा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दंगल चित्रपटाप्रमाणेच पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका या छोट्या गावातील सानिका पवार हिने आई-वडिलांचे प्रोत्साहन व दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कुस्ती प्रकारात थेट राष्ट्रीय पातळीपर्यंत झेप घेतली आहे. बारामतीत सोमवारी झालेल्या विद्यापीठ राष्ट्रीय कुस्ती निवड चाचणी स्पर्धेत ७२ किलो वजनी गटातून सानिका पवार हिने आपल्या प्रतिस्पर्ध्याला धूळ चारत यशाला गवसणी घातल्याने तिची आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राहुल आवारेनंतर पाटोदा तालुक्यातून सानिकाने झेप घेतली आहे.

‘मेरी बेटी मेरा अभिमान’या स्टेटसप्रमाणे पाटोदा तालुक्यातील धनगर जवळा येथील सानिका अशोक पवार या मुलीने कुस्ती या खेळ प्रकारात आपल्या वडिलांसह गावाचा अभिमान जपला आहे.तिचे वडील अशोक पवार हे शेतकरी तर आई गृहिणी असून सानिकाला एक मोठी बहीण व एक छोटा भाऊ आहे. सानिकाला पहिलीपासून खेळाची आवड होती. शाळेतील प्रत्येक स्पर्धेत तिचा सहभाग असायाचा. पाटोदा शहरात चौथीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर तिचा खेळाकडील कल पाहून पुढील शिक्षणासाठी वडिलांनी तिला नेवासा येथील घाडगे पाटील सैनिकी विद्यालयात पाठवले.

या विद्यालयात किक बॉक्सिंगच्या तीने एक-एक पायऱ्या पूर्ण करत राज्यस्तरापर्यंत मजल मारली. आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक संभाजी निकाळजे यांनी तिच्यातील आक्रमकपणा व अचूक टायमिंगचे गुण हेरत तिला कुस्तीकडे वळण्याचा सल्ला दिला. सानिकाने दररोज पहाटेच उठून कुस्तीचा सराव, योग्य आहार, शाळा, त्यानंतर सायंकाळी कुस्तीचा सराव असा असा दिनक्रम ठरवत पुरुषी वर्चस्व असलेल्या कुस्ती या खेळात प्राविण्य मिळवले.

जिल्हा स्पर्धेतही बाजी
नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती महाविद्यालयात सानिका पदवीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत अाहे. श्रीगोंदा येथील शिवाजीराव शिंदे महाविद्यालयात झालेल्या विद्यापीठांतर्गत जिल्हा स्पर्धेत सानिकाने प्रथम क्रमांक मिळवला अाहे. कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयातील विद्यापीठांतर्गत जिल्हा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर विद्यापीठांतर्गत विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली होती. आता पुन्हा एकदा विद्यापीठ निवड चाचणी स्पर्धेत ७२ किलो वजनी गटातून तिने स्वतःला सिद्ध केले असून राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झालेली आहे.

मला देशासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकायचेय
माझ्या आई-वडिलांनी माझा कायम मुलाप्रमाणेच सांभाळले. त्यामुळेच मी कुस्तीसारख्या खेळात पुढे जाऊ शकले. मला शाळेचे प्रमुख घाडगे पाटील व माझे प्रशिक्षक निकाळजे सर यांचे मार्गदर्शन मिळत असून मला पुढे ऑलिम्पिकमध्ये खेळून देशासाठी पदक जिंकायचे आहे. -सानिका पवार, कुस्तीपटू, पाटोदा

बातम्या आणखी आहेत...