आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:सरपंचांच्या हातून अधिक लोकोपयोगी कामे व्हावीत

केज8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचा कार्यकाळ संपत आला आहे. शिल्लक कालावधीतही सरपंचांच्या हातून अधिकाधिक लोकोपयोगी कामे व्हावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी केले. विकासकामांसाठी सरपंचांना जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य लाभेल, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत केज पंचायत समिती कार्यालयात बुधवारी (ता.३) संयुक्त आढावा बैठक, कार्यशाळा व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी पवार हे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जि. प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंकेंसह सर्व विभाग प्रमुख, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी पवार म्हणाले की, आजादी का अमृत महोत्सव शासनाचा उपक्रम सर्वत्र उत्साहात साजरा केला जातोय. सर्व ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन लोकसंख्येच्या तुलनेत वृक्षारोपण मोहीम हाती घ्यावी. नरेगामधून सार्वजनिक ठिकाणी, दुतर्फा रस्ता व गायरान अशा ठिकाणी वृक्षारोपण करावे. तसेच १३ ते १५ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम यशस्वी करावा. असे आवाहन केले. या वेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विजय देशमुख, कार्यकारी अभियंता श्री.चांदवडकर, यशदाचे तज्ञ मार्गदर्शक रवींद्र इंगोले यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक विस्तार अधिकारी सखाराम काशीद यांनी केले.

नरेगातून होणार ग्रा. पं. इमारत
विशेष म्हणजे ज्या ग्रामपंचायतींना अद्यावत इमारत नाही, अशा १४ गावांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रति ग्रामपंचायतीला ३० लाख रुपये किमतीचे ग्रामपंचायत भवन, इमारत बांधकाम मंजुरीचे प्रशासकीय मान्यता आदेश सरपंच, ग्रामसेवक यांना मुख्य कार्यकारी अजित पवार यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. ग्रामपंचायत भवन बांधकामासाठी ४ कोटी २० लाख रूपये निधी वितरित होणार आहे. ग्रामपंचायतीची हक्काची इमारत नसलेल्या गावच्या सरपंच, ग्रामसेवकांनी तत्काळ प्रस्ताव सादर करावेत, असे आदेशही त्यांनी या वेळी दिले.

पाणंद रस्त्यांच्या कामात बीड जिल्हा राज्यात अव्वल
पाणंद रस्ते कामात बीड जिल्हा राज्यात अव्वल आहे. सुरू असलेल्या रस्त्याची कामे गतीने पूर्ण करून घ्यावीत, अशा सूचनाही या वेळी सीइओ पवारांनी दिल्या.

बातम्या आणखी आहेत...