आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउच्च प्राथमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (३१) जिल्ह्यात होणार आहे. ४३ केंद्रांवरून पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा होईल, तर ३६ केंद्रांवरून आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेला वाव मिळावा, गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा तर, आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा राज्य परीक्षा मंडळाकडून घेतली जाते. जिल्ह्यात यापूर्वी २० जुलै राेजी ही परीक्षा नियोजित होती. मात्र, हवामान खात्याने राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. ३१ जुलै रोजी या परीक्षा होतील असे कळवले होते. त्यानुसार आज या परीक्षा हाेणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात पाचवीच्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण ७ हजार ८१८ विद्यार्थी बसलेले आहेत, तर आठवीच्या उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ७ हजार ८६५ विद्यार्थी बसलेले आहेत. या परीक्षांसाठी तालुकानिहाय केंद्र तयार करण्यात आले आहेत. पाचवीसाठी ४३, तर आठवीसाठी ३६ केंद्रांवरून परीक्षा होणार आहे.
सकाळी ११ ते साडेबारा या वेळेत एक पेपर आणि दुपारी दीड ते तीन या वेळेत एक पेपर अशी ही परीक्षा होणार आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, जिल्हा समन्वयक विस्तार अधिकारी तुकाराम पवार हे काम पाहत आहेत.
११ भरारी पथके लक्ष ठेवून
शिष्यवृत्ती परीक्षेत कुठलाही गैरप्रकार होऊ नये, यासाठी ११ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. बीड तालुक्यासाठी शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, आष्टीसाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, परळीसाठी अधीक्षक राजेश खटावकर, शिरूरसाठी अधीक्षक हिरालाल कराड, माजलगावसाठी उपशिक्षणाधिकारी मोहन काकडे, केजसाठी उपशिक्षणाधिकारी नानाभाऊ हजारे, अंबाजोगाईसाठी रंगनाथ राऊत, गेवराईसाठी विठ्ठल राठोड, पाटोद्यासाठी ऋषिकेश शेळके, धारूरसाठी गौतम चोपडे आणि वडवणीसाठी सहायक निरीक्षक कांतीकुमार देवकते यांची या पथकात नियुक्ती केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.