आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश मंडळांची निवड:गुणांकन पद्धतीने होणार गणेश मंडळांची निवड

केज24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘गणराया अवार्ड’ या पारितोषिकासाठी पर्यावरण पूरक व सामाजिक सलोख्याचे उपक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळांची गुणांकन पद्धतीने निवड करून जिल्हास्तरीय व ठाणे निहाय पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यानुसार गणेश मंडळांनी उपक्रम राबवावेत असे आवाहन केज ठाण्याचे सपोनि शंकर वाघमोडे यांनी केले आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या संकल्पनेतून यंदाच्या गणेशोत्सवात उत्कृष्ट गणेश मंडळांना जिल्हास्तरीय व ठाणे निहाय ‘गणराया अवार्ड’ हे पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यासाठी गुणांकन पद्धतीने निवड करण्यात येणार असून खालील मुद्यांवर गुण देण्यात येणार आहेत. यामध्ये पर्यावरण पूरक गणेश मूर्ती, पर्यावरण पूरक सजावट (थर्माकोल प्लास्टिक इत्यादी साहित्य न वापरता), ध्वनी प्रदूषण रहित वातावरण यासाठी प्रत्येकी १० गुण, पाणी वाचवा मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक सलोखा या समाज प्रबोधन विषयावर देखावा, सजावट, स्वातंत्र्याच्या चळवळी संदर्भातील देखावा, सजावट, रक्तदान शिबिर, वैद्यकीय सेवा शिबिर कार्य, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी - विद्यार्थिनींनी त्यांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक बाबतीत केलेले कार्य, महिला, ग्रामीण भागातील वंचित घटकांच्या शैक्षणिक आरोग्य सामाजिक बाबतीत केलेले कार्य, पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा यासाठी प्रत्येकी ५ गुण, गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा पाणी, प्रसाधनग्रह, वैद्यकीय प्रथमोपचार, परिसरातील स्वच्छता, वाहतुकीस अडथळा येणार नाही असे नियोजन आयोजनातील शिस्त (प्रत्येक सुविधेसाठी २ गुण ) ५ गुण, विसर्जन मिरवणुकीतील वर्तनसाठी ३० गुण देण्यात येणार आहेत. यासाठी समिती गठित केलेली असून त्या समिती मार्फत सर्व गणेश मंडळाचे गुणांकन करण्यात येणार आहे.

केज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उत्कृष्ट तीन गणेश मंडळांना पोलीस ठाण्यातर्फे पारितोषिक देण्यात येणार आहे. तर निवडण्यात आलेल्या तीन गणेश मंडळांची परत तालुकास्तरीय समितीद्वारे चाचपणी करून तालुक्यातील उत्कृष्ट एक गणेश मंडळाची जिल्हास्तरीयसाठी निवड करीत जिल्हास्तरीय बक्षीससाठी शिफारस करण्यात येणार आहे. त्यानुसार गणेश मंडळांनी उपक्रम राबवून परितोषिकांचे मानकरी व्हावे असे आवाहन केज ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...