आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआमदार संदीप क्षीरसागर व त्यांचे बंधू अर्जुन क्षीरसागर यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप त्यांचे वडिल रवींद्र क्षीरसागर यांनी केला आहे. नगर रोडवरील निवासस्थानी हा प्रकार घडला. याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र (एनसी) गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
मंगळवारी (ता. १२) साडे दहा वाजता शहरातील त्यांच्या नगर रोडवरील निवासस्थानी हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. तुमच्या बहिणींना घरी का येऊ दिले, या कारणाने संदीप क्षीरसागर व अर्जुन क्षीरसागर यांनी आपली कॉलर पकडून धक्काबुक्की केली.
माझ्यासह बहिणींना घराबाहेर हाकलून दिल्याचे पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. यावरुन संदीप क्षीरसागर व त्यांचे बंधू अर्जुन क्षीरसागर या दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गुरले करत आहेत.
आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांचे काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. परंतु आता क्षीरसागर आणि त्यांच्या वडिलांमध्येच वाद असल्याचे समोर आले आहे. धक्काबुक्की केल्याचा आरोप व थेट पोलिसांत तक्रार दाखल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
कोण आहेत संदीप क्षीरसागर?
संदीप क्षीरसागर हे क्षीरसागर कुटुंबातील उभरते नेतृत्व आहे. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून त्यांनी विधानसभा लढवली. यात त्यांनी त्यांचेच काका जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला होता. अलीकडे बीडच्या राजकारणात संदीप क्षीरसागर यांचा प्रभाव वाढत आहे. धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असल्याने त्यांचे काका जयदत्त क्षीरसागर यांना डावलत त्यांना राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी मिळाल्याचे बोलले जाते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.