आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसरा मेळावा:शिवरायांचा पराक्रम, भगवानबाबांची सात्त्विकता आणि मुंडे साहेबांचा संघर्ष हीच माझी ओळख

शिरूर/पाटोदा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी संघर्षाला घाबरत नाही. छत्रपती शिवरायांचा पराक्रम आणि भगवानबाबांची सात्त्विकता आणि मुंडे साहेबांचा संघर्ष हीच माझी ओळख आहे. मी थकणार नाही, थांबणार नाही आणि कधीही कोणासमोर झुकणार नाही. छत्रपती संभाजीराजांचा आदर्श माझ्यासमोर असल्यामुळे मी संघर्ष करत राहील, अशी भावनिक साद भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी घातली.

सावरगाव घाट येथील भगवान भक्तिगडावर बुधवारी दुपारी एक वाजता दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे या बोलत होत्या. व्यासपीठावर रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, मेघना बोर्डीकर, शिवाजी कर्डिले, आमदार सुरेश धस, बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार भीमराव धोंडे, महंत राधाताई महाराज सानप, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, यशश्री मुंडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना पंकजा म्हणाल्या की, हा चिखल फेकणाऱ्यांचा नाही तर चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे. संघर्ष करणे हे आमच्या रक्तात आहे. चिखलफेक, टीका करणे हे आम्हाला जमत नाही. पण माझ्यावर मर्यादा सोडून काहींनी टीका केली. संघर्षाशिवाय यश नाही, कुणाचे जोडे उचलणाऱ्यांचा कधीच इतिहास होत नाही. मुंडे साहेबांच्या चाळीस वर्षांच्या राजकारणामध्ये केवळ साडेचार वर्षे सत्ता मिळाली. म्हणून संघर्ष हा माझ्या रक्तात आहे असेही त्यांनी सांगितले.

कमळाशिवाय कोणत्याही बटणाला स्पर्श केला नाही
आम्ही कमळाशिवाय दुसऱ्या बटणाला कधीही स्पर्श केला नाही हे सांगताना पंकजा मुंडे या दसरा मेळाव्यात भावनिक झाल्याचे पाहायला मिळाल्या. मी कधीही उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. मी तुमच्यासोबत काम करु. आपण आपले काम करणार आहोत, आता पदाची अपेक्षा करू नका असेही मुंडे म्हणाल्या.

खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या वाहन रॅलीवर पुष्पवर्षाव

बुधवारी सावरगाव घाटकडे जाणारे रस्ते सकाळपासून वाहनांच्या गर्दीने फुलले होते. या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ठिकठिकाणी या मेळाव्यासाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांना चहापाणी व नाष्ट्याची सोय करण्यात आली होती. दुपारी साडेबारा वाजता भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांची गोपीनाथ गड ते भगवान भक्तिगड ही वाहन रॅली कार्यक्रमस्थळी पोहोचली. या वेळी रॅलीवर पुष्पवर्षाव करण्यात आला.

सावरगाव येथे आल्यावर संत भगवानबाबांची केली पूजा
दुपारी हेलिपॅडवर पंकजा मुंडे यांचे आगमन झाले. त्यानंतर मंदिरात जाऊन संत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. त्यांच्यासमवेत भगिनी यशस्वी मुंडे उपस्थित होत्या. पंकजा मुंडे व्यासपीठाच्या ठिकाणी जाताना कार्यकर्त्यांनी जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी केली. या वेळी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे भगवे ध्वज हातात घेत कार्यकर्ते स्वागताच्या व जयजयकाराच्या घोषणा करत होते.

प्रीतम मुंडे यांचे नऊ मिनिटे तर पंकजा यांचे ३६ मिनिटांचे भाषण
बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी दुपारी १ वाजून ३७ मिनिटांनी भाषणास सुरुवात केली दुपारी १ वाजून ४६ मिनिटांनी त्यांनी आपले भाषण आटोपते घेतले. नऊ मिनिटांच्या भाषणात त्यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. पंकजा मुंडे यांनी एक वाजून ४८ मिनिटांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली, तर २ वाजून २४ मिनिटांनी भाषण ३६ मिनिटांत संपवले.

उसाची माेळी, काेयता देऊन केला सत्कार
गाेपीनाथ मुंडे ऊसताेड कामगार संघटनेचे अध्यक्ष गाेरक्ष रसाळ, दत्ताेबा भांगे यांनी दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर जाऊन उसाची माेळी व काेयता भेट देऊन पंकजा मुंडे यांचा सत्कार केला. सावरगाव घाट येथील संत भगवानबाबा ट्रस्ट व सावरगाव ग्रामपंचायतच्या वतीने ज्ञानेश्वरी भेट देऊन सरपंच रामचंद्र सानप, टस्टचे अध्यक्ष संदेश सानप, वसंत सानप यांनी पंकजा मुंडे यांचा सत्कार केला.

पंकजा मुंडे जनसमुदायापुढे नतमस्तक
हा मेळावा दरवर्षीपेक्षाही जास्त क्षमतेने पार पडला. मेळाव्याच्या सुरुवातीलाच भाजप नेत्या पंकजा मुंडे व्यासपीठावर खाली बसून जनसमुदायासमाेर नतमस्तक झाल्या.

दूरवरून आलेल्या कार्यकर्त्यांना पिठलं-भाकरीचं भोजन
सावरगाव घाट येथील भगवान भक्तिगडावर राज्याच्या विविध भागातून आदल्या दिवशीच कार्यकर्ते मुक्कामी आले होते.अशा कार्यकर्त्यांची सावरगाव घाट येथील ग्रामस्थांच्या वतीने येथील जिल्हा परिषद शाळा परिसरात मुक्कामासह पिठलं-भाकरीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...