आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्ये अग्नितांडव:पॉलिसी सर्व्हिसिंग विभागात शॉर्टसर्किट, सात लाख विमा ग्राहकांचे 46 वर्षांपासूनचे दस्तऐवज जळाले; सोळा लाखांची रोकड वाचली

बीड9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
लागलेली आग विझवताना अग्निशमन दलाचे कर्मचारी. तर इन्सेटमध्ये जळून खाक झालेली कागदपत्रे. - Divya Marathi
लागलेली आग विझवताना अग्निशमन दलाचे कर्मचारी. तर इन्सेटमध्ये जळून खाक झालेली कागदपत्रे.
  • दोन मजली इमारतीच्या 11 विभागांतील विमा ग्राहकांच्या कागदपत्रांचे आयुष्य संपले, चार तासांनंतर आगीवर नियंत्रण

नगर राेडवर या कंपनीचे दाेन मजली इमारतीत मालकी हक्काचे मुख्य कार्यालय आहे. रविवारी (८ ऑक्टोबर) रात्री अडीच वाजेच्या सुमारास कार्यालयातील पॉलिसी सर्व्हिसिंग विभागात शाॅर्टसर्किट हाेऊन आग लागली. पाहता पाहता दाेन मजली इमारतीच्या ११ विभागांतील विमा तब्बल ७ लाखांहून अधिक ग्राहकांची कागदपत्रे, सर्व फर्निचर, संगणक अन्य साहित्य जळून खाक झाले. गस्ती वरील पोलिसांना आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी बीड नगरपालिका अग्निशमन, गेवराई, बीड बाजार समितीसह चार बंब व जवानांना पाचारण केले. सलग २५ फेऱ्या करत चार तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. यात सरासरी दीड कोटींहून अधिक नुकसान झाले असून ितजाेरीत असल्यामुळे १६ लाखांची राेकड वाचली. विमा ग्राहकांचे सर्व कागदपत्रांची स्कॅन काॅपी व डेटा राज्यातील चार सर्व्हरवर सुरक्षित असल्याचे मुख्य शाखा व्यवस्थापकांनी सांगितले.

बीड शहरामध्ये भारतीय विमा कंपनीची स्थापना ६ जुलै १९७४ मध्ये झाली. मागील ४६ वर्षांमध्ये बीड जिल्ह्यात बीड, अंबाजोगाई, माजलगाव, गेवराई चार ठिकाणी कंपनीच्या शाखा आहेत. आतापर्यंत सात लाखांहून अधिक विमा ग्राहक व कर्जधारक जाेडले गेले आहेत. शनिवारी (७ ऑक्टोबर) नगर राेड येथील भारतीय विमा कंपनीच्या मुख्य कार्यालयातील ५० हून अधिक अधिकारी व कर्मचारी दैनंदिन कामकाज करून घरी गेले. रविवारी कार्यालयास सुट्टी हाेती. या कार्यालयांसाठी सुरक्षारक्षक आहेत. रविवारी रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक लांडगे हे कर्तव्यावर हाेते. रविवारी रात्री तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास मुख्य कार्यालयात स्फोट हाेत असल्याचा आवाज ऐकू आला. सुरक्षारक्षक लांडगे हे कार्यालयाच्या खिडकीमधून पाहण्यासाठी गेले असता गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनाही विमा कार्यालय येथे काहीतरी झाल्याचा अंदाज आल्याने ते थांबले.

इमारतीमधील खालच्या भागात असणाऱ्या पॉलिसी सर्व्हिसिंग विभागात माेठ्या आगीचा भडका झाला. तत्काळ गस्तीवरील सहायक पोलिस निरीक्षक शेख यांनी विमा कार्यालयास आग लागल्याची माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये दिली. तसेच सुरक्षारक्षक लांडगे यांनी व्यवस्थापक व्ही.जी. राऊत यांना माहिती दिली. व्यवस्थापक राऊत यांनी मुख्य शाखा व्यवस्थापक पी.यू. परदेशी यांना दिली. शिवाजीनगर पोलिसांनी बीड नगरपालिका अग्निशमन विभाग, गेवराई नगरपालिका अग्निशमन विभाग, बीड कृषी उत्पन्न बाजार समिती अग्निशमन विभाग अशा तीनही ठिकाणी माहिती देऊन बंब व जवानांना पाचारण केले. पाच वाजेच्या सुमारास अग्निशमन विभागाचे बंब व जवान घटनास्थळी दाखल झाले.

दाेन मजली इमारत कार्यालय

भारतीय विमा कंपनीचे मुख्य कार्यालय आहे. या ठिकाणी बीडसह माजलगाव, अंबाजोगाई आणि गेवराई येथील शाखा कार्यालयातील कागदपत्रे सुरक्षित ठेवली जातात. यात ऑफिस सर्व्हिसेस, पॉलिसी सर्व्हिसेस, जनरल पॉलिसी सर्व्हिसेस, वेतन पॉलिसी सर्व्हिसेस, दावा विभाग, नवा व्यवसाय, मार्केटिंग विभाग, विकास अधिकारी कक्ष, विमा प्रतिनिधी कक्ष, लेखा विभाग, कॅश काउंटर असे सर्वच विभागातील कागदपत्रे, पॉलिसी, फर्निचर जळून खाक झाले.

आगीमध्ये १६ लाख सुरक्षित

भारतीय विमा कंपनीच्या नगर राेडवरील मुख्य कार्यालयास भीषण आग लागली. यात सर्व साहित्य जळून खाक झाले. मात्र मुख्य व्यवस्थापक यांच्या कक्षा लगत असणाऱ्या ितजाेरीमध्ये १६ लाख रुपयांची राेकड हाेती. केवळ तिजाेरी असल्यामुळेच ही १६ लाखांची राेकड भीषण आगीमध्ये वाचली. आग नियंत्रणात आल्यानंतर परदेशी यांनी ही राेकड साेमवारी बँकेमध्ये जमा केली.

एसपी, डीवायएसपींनी दिली भेट

नगर राेडवरील भारतीय विमा कंपनीच्या इमारतीस भीषण आग लागून माेठे नुकसान झाले. या प्रकरणी शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात नाेंद झाली आहे. साेमवारी सकाळी पाेलिस अधीक्षक ए. राजा, पोलिस उपअधीक्षक लांजेवार, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ठाेंबरे तसेच विमा कंपनीचे आैरंगाबाद येथील स्थावर मालमत्ता व्यवस्थापक श्रीराम, विपणन अधिकारी आर.के. कुलकर्णी आदींनी भेट देत पाहणी केली.

ग्राहकांनी येथे भरावा विमा हप्ता

जज्या ग्राहकांचा विमा हप्ता भरण्याची तारीख आहे किंवा माहिती घ्यावयाची असेल तर ग्राहकांनी नगर राेडवरील विमा मुख्य कार्यालयाच्या शेजारी असलेल्या एसबीएच्या कार्यालयामध्ये विमा हप्ता भरून घ्यावा. ज्यांना पॉलिसी संदर्भातील चाैकशी करण्यासाठी मुख्य कार्यालयाच्या गेट जवळ चाैकशी विभाग नियुक्त केला आहे, अशी माहिती मुख्य व्यवस्थापक पी.यू. परदेशी यांनी ‘दिव्य मराठी’ शी बाेलताना दिली.

पंचनामा करून नाेंद; तपास सुरू

भारतीय विमा कंपनीच्या मुख्य कार्यालयास रविवारी रात्री अचानक आग लागली. कागदपत्रे, फर्निचर, बॅटरी साहित्य अन्य साहित्य भीषण आगीमध्ये जळून खाक झाल्याची माहिती मुख्य शाखा व्यवस्थापक पी.यु. परदेशी यांनी नोंदीमध्ये दिली आहे. पंचनामा करण्यात आला आहे. शिवाजीनगर ठाण्यामध्ये नाेंद करण्यात आली आहे. भारत काळे, सहायक पोलिस निरीक्षक

विमा ग्राहकांची माहिती सुरक्षित

जिल्ह्यातील सात लाखांहून अधिक विमा ग्राहक आहेत. जुलै १९७४ ते मार्च २०२० पर्यंतची सर्व माहिती कागदपत्रांची स्कॅन काॅपी वरिष्ठ कार्यालयामध्ये आहे. सर्व विमा पाॅलीसींचा डेटा हा आैरंगाबाद, मुंबई, पुणे आणि हैदराबाद येथील सराेवरवर सुरक्षित आहे. विमा पाॅलिसी व कर्जाची माहिती केंव्हाही ग्राहकांना उपलब्ध हाेईल. पी.यु. परदेशी, मुख्य शाखा व्यवस्थापक, विमा कंपनी

दाेन दिवसांत काउंटर हाेणार सुरू

विमा अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांमध्ये दाेन दिवसात कॅश काउंटर सुरू हाेतील. तसेच विमा धारकांसाठी चाैकशी केंद्रही चार ते पाच दिवसांमध्ये सुरू केले जाईल. विमाधारकांची माहिती सर्व्हर वर सुरक्षित असल्याने दाेन दिवसात कॅश काउंटर व संगणक कक्ष सुरू हाेईल. धनंजय बाभुळगावकर, सहाय्यक प्रशासकिय अधिकारी

बातम्या आणखी आहेत...