आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील धार्मिक महत्त्व असलेल्या ऐतिहासिक सावळाराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव आज मोठया उत्साहात साजरा झाला. जनतेला भ्रष्टाचार मुक्त शासन आणि रामराज्यासाठी त्यांनी प्रभूच्या चरणी साकडे घातले. अंबेवेस भागातील राम मंदिरातही त्यांनी दर्शन घेतले तसेच शहरातील विविध कार्यक्रमांत सहभाग घेतला.
गणेशपार भागातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या प्रभू श्रीराम मंदिरात आज दुपारी 12 वा. श्रीराम जन्मोत्सव मोठया उत्साहात पार पडला. यावेळी महिला व पुरूषांची उपस्थिती लक्षणीय होती. पंकजा मुंडे यांनी उत्सवात सहभाग घेतला. श्री राम जन्माच्या वेळी पाळण्याची दोरी त्यांच्या हाती देण्यात आली. भाविक महिलांसोबत त्यांनी पाळणाही म्हटला. टाळ, मृदंगाचा गजर आणि संगीताच्या निनादाने वातावरण भारावून गेले होते. आरतीनंतर पंकजाताईंनी श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले. अंबेवेस भागातील काळाराम मंदिरासही त्यांनी भेट देऊन दर्शन घेतले.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके, प्रकाश जोशी, वैजनाथ जगतकर, नगरसेवक पवन मुंडे,महादेव इटके, राजेंद्र ओझा, अरूण पाठक, उमेश खाडे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा सुचिता पोखरकर, नितीन समशेट्टी, मोहन जोशी, योगेश पांडकर, सचिन गिते, आश्विन मोगरकर, अनिश अग्रवाल, विजयकुमार खोसे, राजेश कौलवार, सुशील हरंगुळे, गोविंद चौरे, विकास हालगे, बाळू फुले, मुंजा फुके, विजय बुंदिले, श्रीनिवास राऊत, श्रीपाद शिंदे आदींसह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
श्री वेताळाचे दर्शन
सिध्देश्वर नगर परिसरातील नियोजित श्री वेताळ देवस्थानाला पंकजा मुंडे यांनी आज भेट देऊन दर्शन घेतले. वैद्यनाथ साखर कारखान्याचे संचालक केशव माळी यांनी या मंदिरासाठी स्वतःची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल पंकजाताई यांनी त्यांचे कौतुक केले. मंदिराच्या सामाजिक सभागृह बांधकाम करण्याकरिता खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी दहा लक्ष रूपयाचा निधी दिला असून तसे पत्र पंकजा मुंडे यांनी केशव माळी व भक्तांकडे सुपूर्द केले. मंदिराच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असा शब्दही त्यांनी दिला.
किर्तीनगर येथे उपस्थिती
किर्तीनगर भागात श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा निमित्त ह.भ.प. दत्ता महाराज यांच्या किर्तन श्रवणाचा त्यांनी लाभ घेतला. जन्मोत्सव समितीच्या वतीने विविध क्षेत्रात सामाजिक योगदान देणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला. दसरा मेळाव्यात मंदिर स्वच्छता अभियानसाठी त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सार्वजनिक मंडळाच्या माध्यमातून होत असलेल्या स्वच्छता मोहिमेचे त्यांनी अभिनंदन केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.