आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड जिल्ह्यात जल जीवन मिशनमध्ये झालेल्या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी सामजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे आणि संभाजी सुर्वे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. बीड जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे.
यासाठी चौकशी समितीही नियुक्त केली गेली असून काही जणांवर फौजदारीची कारवाई करण्याची शिफारसही केली गेली आहे. निविदा प्रक्रिया आणि कामे देण्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याने जलजीवन मिशन ही योजना जिल्ह्यात चर्चेत आहे. यातील एक तक्रारदार संभाजी सुर्वे यांच्यावर प्राणघातक हल्लाही झाला होता. दरम्यान, शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड जिल्हा दौऱ्यावर आले असताना भ्रष्टाचार विरोधी समितीचे राज्य कार्याध्यक्ष डॉ. गणेश ढवळे यांनी त्यांची भेट घेतली.
जलजीवन मिशन घोटाळा प्रकरणात एसआयटीमार्फत चौकशी करावी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, तत्कालीन प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे, कार्यकारी अभियंता दादाराव डाकोरे आणि कक्ष प्रमुख नामदेव उबाळे, सहाय्यक लेखाधिकारी बाळासाहेब वीर, टेंडर प्रमुख शिवाजी चव्हाण यांची चौकशी करुन त्यांच्या विरुद्ध संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली.
तसेच ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद विभागातील कार्यालयास लागलेली संशयास्पद आग व सामाजिक कार्यकर्ते तथा तक्रारदार संभाजी सुर्वे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली गेल आहे. उपमुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद : या प्रकरणात सखोल चौकशी करून या प्रकरणातील दोषींवर योग्य ती कठोर कारवाई करू असा सकारात्मक प्रतिसाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे, अशी माहिती डॉ. ढवळे यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.