आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणातून सिंचन क्षेत्रासाठी मांजरा नदीवर असलेल्या पाच उच्च पातळी बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडण्याचे निर्देश कालवा सल्लागार समितीने दिले होते. त्यानुसार बुधवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास धरणाचे सहा दरवाजे ( 25 सेमीने ) उघडून पाणी या बंधाऱ्यांत सोडण्यात आले आहे.
धनेगाव येथील मांजरा धरण हे 224.093 दलघमी साठवण क्षमतेचे असून 21 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 1 वाजता धरण 100 टक्के भरले होते. त्यामुळे धरणावर अवलंबून असलेल्या लातूर शहर, लातूर एमआयडीसी, अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब, या शहरासह बीड, उस्मानाबाद, लातूर या तीन जिल्ह्यातील 61 गावांचा पिण्याच्या पाण्याचा व मांजरा पट्ट्यातील 73 गावातील सिंचनासाठी प्रश्न सुटला होता. मांजरा धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने धरणातून बंधाऱ्यात पाणी सोडावे, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी लावून धरली होती. त्यामुळे 18 मार्च रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतही सिंचनासाठी पाणी सोडण्याचे निर्देश देण्यात आले होते.
लासरा, टाकळगाव देवळा, वांजरखेडा, वांगदरी, कासरा पोहरेगाव या उच्च पातळी बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणीपट्टीचा भरणा करताच लातूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित जगताप यांच्या आदेशावरून बुधवारी सकाळी 8 वाजता मांजरा धरणाचे सहा दरवाजे हे 25 से.मी. उघडून नदीत पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. तर 7.66 दलघमी इतके पाणी 20 तासांपर्यंत सोडण्यात येणार असून शुक्रवारी पहाटे धरणाचे उघडलेले दरवाजे बंद करण्यात येणार आहेत. यावेळी शाखा अभियंता सुरज निकम, दप्तर कारकून विकास ठोंबरे, कालवा निरीक्षक पी. पी. आवाड, एस.व्ही.कांबळे हे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.