आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंक्रांतीसाठी गुळाची मागणी असताना दुसरीकडे महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून प्रमुख बाजारपेठ असलेल्या गुजरातमध्ये गुळाची आवक वाढली आहे. याचा फटका गुळ उत्पादकांना बसत आहे. गतवर्षी ३ हजार प्रतिक्विंटल रुपयांपर्यंत गुळाचा दर गेला होता मात्र, यंदा हंगामाच्या पहिल्या टप्प्यातच दराच्या घसरणीचा सामना करावा लागत असून २ हजार ३०० रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे गुऱ्हाळ चालकांवर संक्रांत आली आहे. चांगला पाऊस होत असल्याने जिल्ह्यात दिवसेंदिवस उसाचे उत्पादन वाढत आहे. जिल्ह्यात सध्या ६० पेक्षा अधिक गुऱ्हाळे सुरु आहेत. आजही बीड जिल्ह्यात अनेक शेतकरी गुऱ्हाळ चालवतात.
कारखान्यांनी वाढवलेली गाळप क्षमता, गुऱ्हाळ चालकांपेक्षा दिला जाणारा अधिकचा दर, गुळ पावडरचे उत्पादन करणारे होत असलेले नवे कारखाने या सगळ्यात पारंपारिक गुऱ्हाळ चालक अजूनही तग धरुन आहे. मात्र त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऊस उत्पादकांना यंदा साखर कारखान्यांकडून २ हजार ५०० रुपये प्रति टन पेक्षा अधिक दर मिळत आहे. गुळाची परिस्थिती मात्र नेमकी उलटी झाली आहे. बाजारात सध्या २ हजार ३०० ते २ जार ६०० प्रतिक्विंटल इतके खाली दर आले आहेत. मुळात बहुतांश गुळाचा सौदा हा २५०० रुपयांच्या आसपासच होत आहे. मराठवाड्यात जालना, लातूर आणि शेजारी नगर ही गुळाची बाजारपेठ आहे. मराठवाड्यातील गुळापैकी ९० टक्के गूळ हा गुजरातसह इतर राज्यांत विकला जातो. सध्या महाराष्ट्रासह इतर राज्यांतून गुजरातमध्ये आवक वाढली आहे.टाकरवण येथील गुऱ्हाळात काम करताना कामगार, या गुऱ्हाळामुळे ऊस उत्पादकांना दिलासा मिळतो तर मजुरांना रोजगार.
लघुउद्योगाची मान्यता हवी
पारंपरिक गुऱ्हाळ चालक हा शेतकरीच आहे. शेती परवडत नाही म्हणून तो गुऱ्हाळांचा माध्यमातून उद्योग करण्यासाठी धोका पत्करून व्यवसाय करतो. या व्यवसायाला लघू उद्योग म्हणून अद्याप मान्यता नाही ही मान्यता द्यावी. यंदा गुऱ्हाळ सुरुवातीलाच तोट्यात आहेत. -गणेश लव्हाळे, गुऱ्हाळ चालक
स्थानिक बाजारपेठही ठरतेय महत्त्वाची
अत्यंत दर्जेदार गूळच निर्यात होतो. पण, याचे प्रमाण सध्या १ टक्का आहे. उर्वरित गूळ हा स्थानिक ठिकाणी विकला जातो. मात्र स्थानिक बाजारपेठेतही संक्रांतीमुळे सध्या मागणी असूनही गुळाचा अपेक्षित दर मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
३० जणांना रोजगार देणारा उद्योग
पारंपारिक गुऱ्हाळ हा अत्यंत कष्टाचा आणि स्थानिक रोजगार निर्माण करणारा उद्योग आहे. एका गुऱ्हाळात ३० माणसे कुटुंबासह काम करत असतात. यासह ट्रॅक्टर, ऊस उत्पादक, बैलगाडी आणि गूळ प्रक्रियेसाठी लागणारे पुरवठादार आदींनाही यामुळे रोजगार उपलब्ध होतो. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत अशा उद्योगांचे महत्व साहजिकच वाढले आहे. गावातच रोजगारही मिळतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.