आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नात्याला काळिमा:पारनेर गावातूनच पोलिसांना निनावी फोन आल्याने वडिलांच्या खुनाला फुटली वाचा; जमीन, पीक कर्जाच्या पैशावरून मुलाने केला बापाचा खून

पाटोदा2 महिन्यांपूर्वीलेखक: महेश बेदरे
  • कॉपी लिंक
  • परस्पर अंत्यसंस्कार करून पुरावा केला नष्ट, पाच जणांना केली अटक

वडिलांच्या खुनाचे बालंट आपल्यावर येऊ नये म्हणून पुरावा नष्ट करण्यासाठी माेठ्या मुलाने लहान भाऊ, तीन चुलत्यांच्या मदतीने बापाच्या मृतदेहावर साेमवारी मध्यरात्रीच अंत्यसंस्कार केले. दरम्यान, मंगळवारी सकाळी गावातून कुणीतरी निनावी फोन करून संशयास्पदपणे अंत्यसंस्कार केले जात असल्याची माहिती पाटोदा पोलिसांना दिली. यानंतर पोलिस गावात पोहोचताच या खुनाच्या घटनेला वाचा फुटली. ही घटना तालुक्यातील पारनेर गावात उघडकीस अाली. वडील महादेव बलभीम औटे (५५) यांना व्यसन असल्याने मोठा मुलगा योगेश व त्यांच्यात नेहमीच जमीन व पैशावरून वाद होत होते. वडिलांना पीक कर्ज घ्यायचे होते. मात्र, वडील पीक कर्जाचे पैसे दारूत घालवतील, असे मोठ्या मुलाला वाटल्याने वाद होत होते. सोमवारी (२३ अाॅगस्ट) मुलगा योगेश व वडील महादेव औटे यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले.

कुऱ्हाड व गजाने हाणामारी झाली. यात महादेव हे जखमी झाले होते. नंतर घरात आतून कडी लावून झोपी गेले. रात्री ११ वाजले तरी वडिलांचा आवाज येत नसल्याचे पाहून धाकटा मुलगा गणेशने नातेवाइकांना बोलावले. कडी तोडून आत पाहिले असता वडील मृतावस्थेत आढळले. वडिलांच्या खुनाचे बालंट आपल्यावर येऊ नये म्हणून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहावर मध्यरात्रीच अंत्यसंस्कार केले. दरम्यान, मंगळवारी (२४ ऑगस्ट) सकाळी साडेनऊ वाजता पाटोदा ठाण्याचे पो. कॉ. आदिनाथ तांदळेंना अज्ञात व्यक्तीने फोन करून पारनेर गावात वृद्ध व्यक्तीवर संशयास्पदपणे अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यानंतर तातडीने पोलिस निरीक्षक मनीष पाटील यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक धरणीधर कोळेकर, पो.कॉ. आदिनाथ तांदळेंसह पथक गावात धडकले.

परंतु, तोपर्यंत पारनेरजवळील येवलवाडी रोडवरील शेतात अंत्यसंस्काराच्या ठिकाणी जळत असलेली लाकडे आणि धूर दिसून आला. गावात पोलिसांची गाडी दिसताच गर्दी पांगली. पोलिसांनी मृत महादेव औटेंचा मुलगा योगेश (३२) व गणेश (२९) व अन्य नातेवाइकांची चौकशी केली. तेव्हा धाकटा मुलगा गणेशने वडील दारू पिऊन घरात पडले आणि त्यांचा मृत्यू झाला, असे उत्तर दिले. मात्र, त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव व बेचैनी पोलिसांच्या लक्षात आली. चौकशीत दोन्ही मुले काहीतरी लपवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. अखेर त्यातील एक जण बावरला व त्याने खुनाची माहिती दिली.

आपलेच सदस्य तुरंगात जाऊ नये, यासाठी मध्यरात्रीच केले अंत्यसंस्कार
वडिलांचा मृत्यू आपल्याकडून झालेल्या मारहाणीमुळेच झाल्याचे कळताच दोन्ही भाऊ घाबरले. त्यांनी चुलते विष्णू, वाल्मीक व परमेश्वर औटे यांना याची माहिती दिली. परंतु, आपल्याच कुटुंबातील सदस्य तुरुंगात जाऊ नये, यासाठी त्यांनी मध्यरात्रीच अंत्यसंस्काराची योजना आखली होती. त्यानुसार महादेव यांचा मृत्यू घरातच झाल्याचा बनाव करत मध्यरात्रीच अंत्यविधी उरकला. मात्र, गावातून पाेलिसांना कुणीतरी अज्ञात व्यक्तीने केलेल्या फोनमुळे आणि पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या खुनाच्या घटनेला वाचा फुटली.

जमिनीची वाटणी झाली नसल्याने होत असत वाद
महादेव औटे यांचे थोरला मुलगा योगेश, धाकटा गणेश आणि पत्नी गंगुबाई (५०) असे चौघांचे कुटुंब. पत्नी गंगुबाईंना पक्षाघात झाल्याने त्या अंथरुणाला खिळून आहेत. योगेश विवाहित असून तो पुणे येथील खासगी कंपनीत होता. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे नोकरी गेल्याने गावी आलेला हाेता. मात्र, त्याला दारूचे व्यसन लागले. त्यामुळे कौटुंबिक वाद होत होते. या कुटुंबाकडे १२ एकर जमीन आहे. जमिनीची वाटणी झालेली नसल्याने जमिनीचाही वाद होत होता.

दोन भाऊ, तीन चुलत्यांना अटक
डीवायएसपी विजय लगारे, पीआय मनीष पाटील यांनी भेट देऊन या प्रकरणात योग्य सूचना दिल्या. एपीआय कोळेकर, पोलिस कॉन्स्टेबल तांदळे, सानप, कातखडे, तांबे, घुमरे, क्षीरसागर, सोनवणे आदी कर्मचाऱ्यांनी हा खुनाचा प्रकार उघडकीस आणला असून दोन भाऊ, तीन चुलते अशा पाच जणांना अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...