आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:68200 हेक्टर क्षेत्रावर होणार पेरणी; उसाचे क्षेत्र कायमच राहणार असण्याची शक्यता

अंबाजोगाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई तालुक्यात या वर्षी ६८ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होत आहे. सोयाबीन आणि कपाशीचा पेरा सर्वाधिक असणार आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वीची मशागत पूर्ण केली असून सध्या शेतकरी खते, बियाणे खरेदी करताना दिसत आहेत. कापसापाठोपाठ जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. या वर्षी ऊस कारखान्याला घालण्यासाठी शेतकऱ्यांना प्रचंड त्रास झाला असला तरीही उसाचे क्षेत्र गतवर्षीएवढेच राहील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

गतवर्षी कापसाला ११ हजार ते १४ हजार रु. क्विंटल दर मिळाला. सोयाबीनचा सरासरी ६ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. त्यामुळे यंदा शेतकरी सोयाबीनचे व कापसाचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. बीडमध्ये सर्वाधिक लागवड कापसाची होते. जिल्ह्यात सुमारे तीन लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाचे उत्पादन घेण्यात येते. गतवर्षी कापसाला मिळालेल्या चांगल्या दरामुळे कापसाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. साठेबाजीवर अंकुश ठेवण्यासाठी पंचायत समिती कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांचे संयुक्त पथक नेमण्यात आलेले आहे. रासायनिक खताचा सध्या तुटवडा नाही, परंतु शेतकरी काही ठरावीक कंपनीचाच डीएपी मागत आहेत. त्याची कमतरता आहे. कोणत्या दुकानात खत उपलब्ध आहे याची माहिती कळण्यासाठी बीड फर्टिलायझर नावचे ॲप तयार केले आहे. अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी दिली.

तक्रारी येणार नाहीत, याची दक्षता घ्या
जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या खते, बियाणे आणि कीटकनाशके यांचा योग्य दराने व प्रमाणात पुरवठा करावा तसेच शेतकऱ्यांची कृषी निविष्ठांबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारी येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी दिल्या.

असे राहील पेरणी क्षेत्र
सोयाबीन ५४ हजार हेक्टर, कापूस ३ हजार हेक्टर, तूर १५०० हेक्टर, मूग व उडीद ५०० हेक्टर, बाजरी ५००, चारा वापर ज्वारी २००० हेक्टर, मका ५०० हेक्टर, भाजीपाला, मिरची २००० हेक्टर. उसाचे क्षेत्र गेल्या वर्षी ७ हजार हेक्टर होते. या वर्षी खोडव्याचा ऊस ६ हजार हेक्टर, ५०० हेक्टर नवीन लागवड तर पूर्वहंगामी १५० हेक्टर असून सुरू हंगाम ३५० हेक्टर असणार आहे.

थेट कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा
पेरणीपूर्वी रासायनिक, बुरशीनाशक, कीटकनाशक प्रक्रिया करावी. नंतर जैविक बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी; जेणेकरून रोग कीड होणार नाही व उत्पादन वाढेल. अडचण निर्माण झाल्यास अथवा तक्रार असल्यास थेट कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.
पंडित काकडे, कृषी सहायक

बातम्या आणखी आहेत...