आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:खडकाळ जमिनीमध्ये एकाच वर्षात तीनदा घेतले भरघोस सोयाबीन पीक; लोणवळ तांड्यावरील वृद्ध शेतकरी दांपत्याचा प्रयोग

दिंद्रूड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोणवळ तांडा येथे एका शेतकरी दांपत्याने आपल्या खडकाळ शेतात एकाच वर्षात तब्बल तीनदा सोयाबीनचे भरघोस पीक घेतले. त्याचा उताराही बऱ्यापैकी घेतला असून इतर शेतकऱ्यांसमोर त्यांनी आदर्श ठेवला आहे.

तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या पाठीमागे असलेल्या लोणवळ तांड्यातील (सेवागड) रहिवासी असलेल्या जयसिंग फत्तू राठोड व त्यांची पत्नी मोटाबाई जयसिंग राठोड हे वयाची साठी पार केलेले वयोवृद्ध दांपत्य. त्यांना तीन मुले असून ते तिघेही स्वतंत्र राहतात. राठोड दांपत्याच्या वाट्याला आलेल्या शेतीत त्यांनी २८ गुंठ्यांत खरीप पेरणीच्या वेळी २६ जूनला सोयाबीनची पेरणी केली होती. त्यांना १५ कट्टे (साडेसात क्विंटल) सोयबीन झाले.

त्यानंतर जयसिंग राठोड यांनी ९ सप्टेंबर रोजी दुसऱ्यांदा शेतात सोयाबीनची पेरणी केली. काढणी डिसेंबर महिन्यात केली असता त्यांना १४ कट्टे (सात क्विंटल) सोयाबीन झाले. दोनदा सोयाबीन पीक घेतल्यानंतर जयसिंग राठोड यांनी परत जानेवारी महिन्यात त्याच शेतात तिसऱ्यांदा सोयाबीन पेरले. तिसऱ्या वेळी परत वाण बदलले. सध्या त्यांच्या शेतात तिसऱ्यांदा पेरलेले सोयाबीन डौलदार दिसत आहे. सोयाबीनच्या एका झाडास दीडशे पेक्षा जास्त शेंगा व फुले लागलेली आहेत. त्यामुळे या वेळीही सोयाबीनला चांगला उतारा येईल, असा शक्यता राठाेड दांपत्याने वर्तवली.

खडकाळ जमीन, वृद्ध दांपत्याचा निर्धार : विशेष म्हणजे ही जमीन खडकाळ. विहिरीच्या पाण्यावरच सोयाबीन तग धरून आहे. राठोड दांपत्याचे वय ६०-६५ वर्षे असतानाही ते एखाद्या तरुण शेतकऱ्याला लाजवेल असे कष्ट शेतात करून भरपूर उत्पादन घेत आहेत.

सोयाबीन पाहण्यासाठी येतात शेतकरी : अनेक शेतकरी या राठोड दांपत्याने कष्ट करून घेतलेले सोयाबीन पीक पाहण्यासाठी लोणवळ तांडा येथे येतात.

बातम्या आणखी आहेत...