आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन, नवी दिल्ली व सरस्वती सेवाभावी संस्था वडगाव यांच्या संयुक्त सहकार्याने बीड जिल्ह्यात ग्रामीण पोलीस स्टेशन येथे “बालमित्र पोलीस कक्ष” याचे उद्घाटन करण्यात आले. हा कक्ष बालकांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले.बीड येथे मंगळवारी (ता.१४ जून) कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या अॅड.प्रज्ञा खोसरे, विधी सेवा प्राधिकरणचे सिद्धार्थ गोडबोले, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे, सदस्य सुरेश राजहंस, संतोष वारे, अॅड.जाधव, रमेश कुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना नंदकुमार ठाकूर म्हणाले, बालस्नेही समाज व बालस्नेही पोलिस निर्मितीची गरज आहे. बालस्नेही पोलिस बनण्यासाठी आई, वडीलांनी मुलांशी चांगला संवाद साधत पोलिसमामा विषयी सकारात्मकता निर्माण केली पाहिजे.
कुठे भीतीदायक वातावरण असेल तर पोलिस मामा मदतीला येतील, असा विचार मुलांवर बिंबवला पाहिजे. जेणेकरून आपत्कालीन समयी चिमुकले पोलिसांशी संपर्क साधू शकतील. जिल्हा बालकल्याण समिती अध्यक्ष अशोक तांगडे म्हणाले, बालस्नेही वातावरण निर्मिती घरापासून ते समाजातील वावरापर्यंत व्हायला हवी. तेव्हाच बालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्मितीवर आपण भर देऊ शकू, असेही त्यांनी सांगितले. यावेळी इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. कर्मचारी याप्रसंगी हजर होते.
प्रभावी कार्य करत बालकांच्या समस्या मार्गी लावूयात
बालमित्र कक्षाची संकल्पना अधिक उपयुक्त आहे. बीड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या ठिकाणी मुलांसाठी विविध सुविधा दिल्या. इथे खेळण्या आहेत, निवासाची व्यवस्था चांगली आहे. याठिकाणचे वातावरण हे बालकांच्या दृष्टीने सकारात्मक आहे. आपण सर्वांनी एकत्र येत बालकांचे भवितव्य अधिक उज्ज्वल करावे. १८ वर्षाखालील मुले व मुली आहेत, त्यांच्या समस्या सोडवण्याविषयी एकत्रितपणे चांगले काम करूया, असे प्रतिपादन राज्य बाल संरक्षण आयोगाच्या सदस्या अॅड.प्रज्ञा खोसरे यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.