आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:पोलिस उपनिरीक्षक मिलिंद कसबे यांचे प्रतिपादन, पोलिस भरती प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन

बीड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणतेही यश गाठण्यासाठी सातत्याचा नियम अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना, सातत्य आणि स्वतःशी प्रामाणिकपणे राहावे. या प्रामाणिकपणामुळेच यशाचे मार्ग खुले होतात, असे प्रतिपादन केंद्रीय पोलीस उपनिरीक्षक मिलिंद कसबे यांनी व्यक्त केले.

बीड शहरातील सावंत प्लाझा, मित्र नगर चौकाजवळ शिवाजी नगर येथे बार्टी मार्फत सुरु असलेल्या सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे पोलीस भरती बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारी (ता.६ जून) आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात कसबे हे बोलत होते. यावेळी सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे केंद्र प्रमुख यशवंत वाव्हळकर, पत्रकार सुनिल डोंगरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना मिलिंद कसबे म्हणाले की,अभ्यासात सातत्य ठेवले तर कोणत्याही परीक्षेत यश मिळविणे अवघड नाही. सर्वसामान्य विद्यार्थी सुध्दा युपीएससी एमपीएससी परीक्षेत यश मिळवू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्यांने अभ्यासात सातत्य ठेवून पूर्ण कार्यक्षमतेने प्रयत्न करावेत. शिक्षक, प्राध्यापक, शासकीय कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी बनून देशसेवा करावी. स्पर्धा परिक्षांची तयारी करीत असताना प्रचंड आत्मविश्वास ठेवावा. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांनो स्वत:शी प्रामाणिकपणा ठेवून स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करावा.

त्याचबरोबर अवांतर वाचनावरही अधिक भर द्यावा. नुसते अवांतर वाचन करून भागणार नाही तर त्याच्या नोट्स काढायला शिका. कारण आकलन झालेल्या बाबींचे टिपण करणे ही अतिशय चांगली बाब आहे. यातून विविध विषयांचे आकलन सोयीचे होते. सातत्यपूर्ण अभ्यासातून एक दिवस तुमच्या आयुष्यात नक्कीच चांगला येईल. तुम्ही यशाची गोड फळे जेव्हा चाखाल तेव्हा आपल्याला समाजासाठी कार्य करायचे आहे, हे देखील तितकेच लक्षात घेणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांनी प्रशासन सेवेत रूजू झाल्यावर कुशल प्रशासक म्हणून नावलौकिक मिळवावा. तसेच आपले पद सदैव समाजाच्या कामी आले पाहिजे, असे कार्य नेहमी करीत राहावे, असे मत मिलिंद कसबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.अमोल क्षीरसागर यांनी केले व सूत्रसंचलन प्रा.भरत खेत्री यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. शिवाजी रुपनर यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सम्राट प्रतिष्ठान संचलित राजर्षी शाहू स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे केंद्र सहाय्यक प्रा.अविनाश वडमारे, कार्यालयीन कर्मचारी ग्रंथपाल सचिन काकडे, प्रा.प्रतिक्षा हिवरकर, प्रा. देवेंद्र कांबळे, विनोद जोगदंड, मुकेश निसर्गंध, दिपक वाघमारे यांनी परिश्रम घेतले. यावेळी पोलिस भरती प्रशिक्षणार्थींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

बातम्या आणखी आहेत...