आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्षभरापूर्वी एचआयव्हीने वडील गेले अन् पाठोपाठ चार महिन्यांनी आईचेही निधन झाले. छोटी बहीण, भाऊ यांचा भार अवघ्या १८ वर्षांच्या ‘ति’च्या खांद्यावर आला. ‘ति’च्यासह दोन्ही भावंडेही बाधित आहेत. मजुरी करून तिने भावंडांचे पोषण सुरू केले खरे पण दुर्दैवाने छोट्या बहिणीला बोनमॅरो कॅन्सर झाला. गुरुवारी जिल्हा परिषदेने सीईओ, डीएचओंच्या पुढाकारातून उपचारासाठी ५१ हजारांची मदत करत ‘ति’च्या संघर्षाला बळ दिले.
आष्टी तालुक्यातील एका छोट्या गावातील दीक्षा (बदललेले नाव). तिची आई, वडील, बहीण, भाऊ हे सगळे कुटुंब एचआव्हीबाधित. दहावीनंतर दीक्षाने बीडमध्ये नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. परिचारिका अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष होत नाही तोच वर्षभरापूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले. या धक्क्याने आईही आजारी पडली अन् नंतर अवघ्या चार महिन्यांत आईने अखेरचा श्वास घेतला. छोटी बहीण, भावाची जबाबदारी तिच्या खांद्यावर आली अन् नर्सिंगचे शिक्षण सोडून तिने गाव गाठले. घरची जमीन नाही, उत्पन्नाचे साधन नाही. गरीब परिस्थिती. अशा स्थितीत तिने शेतात मोलमजुरी करून भावंडांचा सांभाळ सुरू केला.
पण, दुर्दैवाने इथेही तिची पाठ सोडली नाही. बाधित असलेली तिची लहान बहीण सारखी आजारी पडू लागली अन् बोनमॅरो कॅन्सरचे निदान झाले. या आजारावर कायमस्वरूपी कुठलाच इलाज नाही. सतत रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. हजारोंचा खर्च यात होतो. विहान प्रकल्पाचे डॉ. राजेंद्र दहिवाळ यांना ही बाब कळाली. सीईओ अजित पवार, जिल्हा आरोग्य आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांची भेट घेत हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवला. गुरुवारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने या मुलीच्या उपचारासाठी ५१ हजारांची आर्थिक मदत केली. सीईओ पवार, डीएचओ गितेंसह डेप्युटी सीईओ प्रमोद काळे, डॉ. राजेंद्र दहिवाळ, स्मिता कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
वैयक्तिक मदतही करणार : सीईओ पवार, डीएचओ डॉ. गिते
जि. प. च्या माध्यमातून आम्ही ५१ हजारांची आर्थिक मदत मुलीच्या उपचारासाठी केली आहे. उपचारांचा खर्च पहाता वैयक्तीक स्वरूपात आम्ही काही अधिकारीही आर्थिक मदत करू ज्यामुळे उपचारांना सहाय्य होईल, असे सीईओ पवार, डीएचओ डॉ. गिते यांनी यावेळी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.