आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्रीडा व सांस्कृतिक उपक्रमातून विद्यार्थ्यांचे सुप्त कलागुण विकसित होऊन त्यांना वाव मिळत असतो. विद्यार्थ्यांना संधीचे सोने करता आले पाहिजे. यातूनच व्यक्तिमत्त्व विकास व आयुष्याची जडणघडण होत असते. संघर्ष हाच खरा यशाचा पाया असतो. त्यामुळे युवकांनी संघर्षातून पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालय, अंबाजोगाई येथील विद्यार्थ्यांसाठी सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांच्या नियोजनाखाली १४ ते १६ मार्च दरम्यान क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, रांगोळी स्पर्धा, पेहराव स्पर्धा, नृत्याविष्कार, गीतगायन, नाटिका तसेच विविध कला व गुणदर्शनाचे सादरीकरण या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. विजेत्यांना पारितोषिक वितरण करताना डॉ.गोखले हे बोलत होते. कार्यक्रमासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलसचिव दिगंबरराव चव्हाण, प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते डॉ.राजेश इंगोले, पत्रकार दत्तात्रय अंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.राजेश इंगोले म्हणाले की, शेतकरी हाच खरा जगाचा पोशिंदा आहे. त्यामुळे कृषी संस्कृतीमध्ये त्याचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे.
क्रीडा महोत्सव म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी असते. विद्यार्थ्यांनी निकोप, निखळ आणि निरामय मनाने आणि खेळाडू वृत्तीने खेळास सामोरे गेले पाहिजे. पत्रकार दत्तात्रय अंबेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कृषीच्या विद्यार्थ्यांची नाळ कायम मातीशी असावी, अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.अजित पुरी यांनी केले तर आभार डॉ. रवींद्र चव्हाण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ. मोहन धुप्पे, डॉ. बसलिंगाप्पा कलालबंडी, डॉ. दीपक लोखंडे, डॉ. सुहास जाधव, प्रा सुनील गलांडे, डॉ. नरेशकुमार जायेवार, प्रा. संजय राठोड, डॉ. योगेश वाघमारे, डॉ. विद्या तायडे, प्रमोद कळसकर, अरुण तोंडारे, अनंत मुंडे, अनिल खेडेकर यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.
विविध स्पर्धेतील या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक
धावण्याच्या स्पर्धेत मुलांमध्ये पवन इंगळे, मुलींमध्ये अंजली जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावला. बुद्धिबळ स्पर्धेत मुलांमध्ये गौरव धायगुडे, मुलींमध्ये अंजली कुंभार हिने प्रथम क्रमांक पटकावला. यासह माधुरी करडे हिची रांगोळी प्रथम क्रमांक मिळवणारी ठरली. सांघिक खेळ कबड्डी स्पर्धेत कृषी पदवी तृतीय वर्षाचा संघ विजयी ठरला. क्रिकेट व हॉलीबॉल स्पर्धेमध्ये द्वितीय वर्षाचा संघ विजयी ठरला. एकल नृत्य स्पर्धेत भाग्या ऊन्नी हिने प्रथम क्रमांक पटकावला तर समूह नृत्य स्पर्धेत प्रथम वर्षाचा संघ विजयी ठरला. पारंपरिक वेशभूषा स्पर्धेत पिंकी भुरिया हिने प्रथम क्रमांक पटकावला. या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देत गौरवले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.