आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:हरखून गेले विद्यार्थी; बीड येथील चंपावती विद्यालयाच्या सन 1987 च्या दहावीच्या बॅचचा स्नेहमिलन मेळावा उत्साहात

बीड17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड येथील चंपावती विद्यालयाच्या सन १९८७ च्या बॅचच्या वर्गमित्रांचा स्नेहमिलन उत्साहात पार पडला. वर्गमित्रांशी गप्पा करण्यासह आपल्या शिक्षकांना भेटून हितगुज साधताना माजी विद्यार्थी चांगलेच रमून गेल्याचे पाहायला मिळाले. चंपावती विद्यालयाच्या प्रांगणात दैनंदिन परिपाठाता या माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर शाळेत ज्ञानदान करणारे जे गुरूवर्य आज हयात नाहीत त्यांना तसेच हयात नसणाऱ्या वर्गमित्रांना दोन मिनीटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर शालेय शिस्तीचे पालन करून सर्व विद्यार्थी रांगेत आपापल्या वर्गात स्थानापन्न झाले. यानंतर संस्थेचे सचिव जगदीश काळे, जि.प.चे माध्यमिक शिक्षणाधिकारी सारूक, शाळेच्या विद्यमान मुख्याध्यापिका कुलकर्णी व सर्व माजी शिक्षकांच्या हस्ते सरस्वती पुजन करण्यात आले.

शाळेची यशस्वी परंपरा पुढे कायम ठेवणाऱ्या शाळेतील विद्यमान शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यासह शाळेच्या पहिल्या महिला मुख्याध्यापिका नयना कुलकर्णी यांचाही सत्कार माजी विद्यार्थीनींच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे सचिव काळे व माध्यमिक शिक्षणाधिकारी सारूक यांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना गेट-टुगेदरचे महत्व विषय केले. माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेला कपाट भेट देण्यात आले. या बॅचचाच एक विद्यार्थी असलेले शिवसेना बीड जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेतील कार्यक्रमानंतर अमृत मंगल कार्यालयात सर्व माजी विद्यार्थी, गुरूजन वर्ग व शाळेचे विद्यमान शिक्षक हे एकत्र आले. मान्यवर गुरूवर्यांचा सत्कार माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार, स्मरणचिन्ह व भेटवस्तू देवून करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...