आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील अरणवाडी साठवण तलावाजवळून खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग जातो. गतवर्षी या रस्त्याचे काम करण्यात आले. रस्त्याचा भराव खचू नये म्हणून ५४ लाख रुपयांच्या निधीतून सिमेंट भिंतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. परंतु, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. निकृष्ट कामामुळे भविष्यात रस्त्याला धोका निर्माण होऊ शकतो.
धारूर तालुक्यातील बहुचर्चित अरणवाडी साठवण तलावातील खामगाव-पंढरपूर मार्गाच्या रस्त्याचे काम गतवर्षी अरुंद स्वरूपाचा करण्यात आले होते. काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचा मातीचा भराव खचू लागला होता. यामुळे राष्ट्रीय रस्ते विकास मंडळाकडून ४० मीटर लांबीची ५४ लाख रुपयांची भिंत बांधण्यात येणार होती. ही भिंत धोका असणाऱ्या तलावाकडील बाजूकडून बांधण्याची गरज होती. भिंत न बांधल्यामुळे येथील धोका कायम आहे. तलावातील पाणी पातळी कमी झाल्याने मागील पंधरा दिवसांपासून धोका असणाऱ्या बाजूकडून भिंत न बांधता पूर्वेकडील बाजूकडून भिंत बांधण्यास सुरुवात केली आहे.
या भिंतीचा पाया खोलवर व मजबूत न बांधता दीड ते दोन फूट खोलीवरून बांधकाम सुरू केले आहे. या कामाकडे अधिकारी फिरकत नसल्याने गुत्तेदाराच्या मर्जीप्रमाणे थातूरमातूर काम सुरू आहे. सध्या बांधण्यात येत असलेली भिंत ही अगदी अरुंद स्वरूपाची भविष्यात टिकेल की नाही असा प्रश्न आहे. भिंतीत वापरण्यात येत असलेले लोखंडी गज हे पायात खोलवर न टाकता वरवर टाकून काम सुरू आहे. ही भिंत मजबूत झाल्यास भविष्यात मोठे धोके टळणार आहेत. भिंत बांधताना रस्ते विकास महामंडळाने नेमलेले अभियंते उंटावरून कारभार हाकत असल्याने त्याचा फायदा संबंधित गुत्तेदार घेत आहेत. हे काम थांबवून चांगल्या दर्जाची भिंत बांधण्याची मागणी होत आहे.
सुरुवातीपासून तक्रारी कायम
अरणवाडी तलावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम गतवर्षी केले होते. या रस्ता कामाबाबत अनेक तक्रारी वाढल्या होत्या. अशीच गत पुन्हा संबंधित गुत्तेदाराने भिंतीच्या बांधकामाच्या बाबतीतही सुरू केली आहे. सुरुवातीपासून हे काम वादात आहे. संबंधित विभागाचे अधिकारी मात्र गुत्तेदाराच्या मर्जीप्रमाणे काम करताना दिसत आहेत.
अहवाल सादर करण्याच्या सूचना
तलावातून जाणाऱ्या रस्त्यासाठी ५४ लाख रुपयांची भिंत बांधण्यात येत आहे. सध्या सुरू असलेल्या कामाबाबत नेमलेल्या कन्सल्टंटस एजन्सीला याप्रकरणी तत्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
-अतुल कोटेचा, उपअभियंता रस्ते विकास महामंडळ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.