आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकट:काळी गुढी उभारून केला साखर आयुक्त, कारखानदारांचा निषेध; जिल्हाधिकारी कार्यालया समोर ऊसप्रश्नी शेतकऱ्यांचे आंदोलन

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव तालुक्यातील तीन कारखाने बाहेरून ऊस आणत असल्याने स्थानिक शेतकऱ्यांचा पंधरा लाख टन ऊस जागेवर उभा आहे . कारखान्यांच्या या मनमानीकडे साखर आयुक्त दुर्लक्ष करत असल्याने आज शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर काळी गुढी उभारुन शेतक-यांनी साखर आयुक्त व कारखानदारांचा निषेध व्यक्त केला .

जिल्ह्यातील काही कारखाने बाहेर जिल्ह्यातून ऊस आयात करत असल्याने शेतकर्‍यांचा मोठ्या प्रमाणात ऊस तसाच उभा आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. या प्रश्नी लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष होत असून साखर आयुक्त कार्यालयही कानाडोळा करत आहे. माजलगांव तालुक्यातील सोळंके कारखाना, छत्रपती कारखाना व जयमहेश कारखान्याने परभणी व इतर जिल्ह्यातून ऊस आयात केल्याने तालुक्यात शेतकर्‍यांचा जवळपास १५ लाख टन ऊस उभा आहे. अशीच परिस्थिती जिल्हाभरात आहे. ‍ यामुळे तीनही कारखान्यांकडे स्थानिक शेतकऱ्यांचा ऊस घ्यावा अशी मागणी करूनही कारखाना बाहेर जिलह्यातील ऊस आणत आहे.

या प्रकरणी साखर आयुक्त, प्रादेशिक साखर संचालकांकडे तक्रार करूनही जय महेश व इतर कारखान्यावर कारवाई केली जात नाही. उसाच्या गाड्या अडवून आंदोलन केले तरीही जय महेश व कारखाने दखल घेत नाही. यामुळे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने भाई गांगभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालया समोर काळी गुढी उभारुन शेतक-यांनी साखर आयुक्त व कारखानदारांचा निषेध व्यक्त केला. गुढीपाडव्यापासून शेतकऱ्यांचे नवीन वर्ष चालू होते. नवीन वर्षात काही खरेदी शेतकऱ्यांना करावी लागते. मात्र माजलगाव तालुक्यातील कारखान्यांच्या मनमानी कारभारमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. जर शेतकऱ्याने आत्महत्या केली तर या कारखान्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाई गंगभिषण थावारे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...