आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विष प्राशन:पैशासाठी छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या ; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

केज23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घराचे बांधकाम करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन का येत नाहीस? या कारणावरून सासरच्या लोकांकडून होत असलेल्या छळास कंटाळून एका २६ वर्षीय विवाहित महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ढाकेफळ (ता. केज) येथे घडली. याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध युसूफवडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पती, दिरास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. ढाकेफळ (ता. केज) येथील मृत शिल्पा योगिराज घाडगे हिचा विवाह आठ वर्षांपूर्वी योगिराज भिवाजी घाडगेसोबत झाला होता.

लग्नानंतर त्यांना दोन मुली, एक मुलगा अशी तीन अपत्ये झाली. दरम्यान, घर बांधकामासाठी माहेरहून २ लाख रुपये घेऊन ये म्हणत पती योगिराज घाडगे, सासू लक्ष्मीबाई घाडगे, दीर बाळासाहेब घाडगे, जाऊ माया घाडगे यांनी शिल्पाकडे तगादा लावला. मात्र तिने तेवढी रक्कम आणण्यास नकार दिल्याने त्यांनी तिला शिवीगाळ, मारहाण करून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. यास कंटाळून शिल्पा घाडगे हिने ९ सप्टेंबरला सकाळी ९ वाजता विष प्राशन केले. उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले असता १० सप्टेंबरला रात्री २ वाजता तिचा मृत्यू झाला. अनिता दिलीप सिरसट (रा. फुलेनगर, धारूर) यांच्या फिर्यादीवरून शिल्पाचा पती योगिराज घाडगे, सासू लक्ष्मीबाई घाडगे, दीर बाळासाहेब घाडगे, जाऊ माया घाडगे या चौघांविरुद्ध युसूफवडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला. सहायक पोलिस निरीक्षक संदीप दहिफळे, फौजदार आर. जे. शेख, शामराव खनपटे यांनी पती योगिराज घाडगे, दीर बाळासाहेब घाडगे यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

बातम्या आणखी आहेत...