आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील चार दिवसांपासून उन्हाचा पारा सातत्याने वाढत असून दुपारच्या वेळी तर रस्त्यावरदेखील शुकशुकाट दिसत आहे. वाढत्या उन्हामुळे उन्ह बाधल्यास उष्माघात होण्याचीदेखील शक्यता असून त्यामुळे किमान दुपारच्या वेळी तरी घराबाहेर पडणे टाळा व आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्या असा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.
पाटोदा शहर व परिसरात गेल्या काही दिवसांत उन्हाची काहिली प्रचंड वाढली आहे. दुपारच्या वेळीं तर रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असून उन्हाची बाधा झाल्याने डायरिया, जुलाब उलट्या, ताप या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तर तीव्र प्रमाणात ऊन लागल्यास उष्मघात तसेच बीपी शुगरच्या रुग्णांमध्ये स्ट्रोक बसण्याचीही शक्यता असल्याने उन्हापासून बचावासाठी विशेष काळजी घेण्याचे अावाहन करण्यात आले आहे .
उष्माघात म्हणजेच हीट स्ट्रोक किंवा सनस्ट्रोक. ही जीवघेणी अवस्था आहे. अतिउष्णतेने शरीरातल्या प्रथिनांवर दुष्परिणाम होणे व अवयवातील पेशींमध्ये हा परिणाम होतो. यात मृत्यूचे कारण बहुधा ‘मेंदूसूज’ म्हणजेच एनसेफलोपथी हे असते. यामध्ये शरीराचे तापमान अकस्मात उच्च पातळीवर जाते. योग्य ते उपचार वेळेवर न मिळाल्यास संबंधित व्यक्तीच्या मेंदूच्या उतींना नुकसान पोहोचून व्यक्ती कोमात जाण्याची व दगावण्याचीही शक्यता असते. उष्माघात हा प्रामुख्याने अर्भकं, लहान मुलं, वयोवृद्ध, पाणी कमी पिणारे लोक, दीर्घ आजारी किंवा मद्यप्राशन करणाऱ्यांमध्ये आढळतो.
सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जास्त असते तेव्हा शक्यतोवर उन्हात फिरणे, काम करणे किंवा खेळणे टाळावे. बाहेर जाणे आवश्यक असल्यास काही गोष्टी पाळल्यास उन्हाचा त्रास कमी होऊ शकतो. शक्य असल्यास दुपारच्या वेळी कामासाठी बाहेर पडू नका. सकाळी किंवा संध्याकाळी उशिरा कामांची विभागणी करा. अगदीच आवश्यक असेल सौम्यरंगांचे आणि ढिले कपडे वापरावे. टाइट जीन्स आणि भडक कपडे वापरणे टाळावे. टोपी, कानाला आणि डोक्याला रुमाल किंवा स्कार्फ बांधवा, छत्रीचा वापर करावा. जवळ पाण्याची बाटली ठेवावी. गरजेप्रमाणे मधून मधून पाणी प्यावे. तापमानवाढीबरोबरच पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे. तहान लागण्याची वाट न पाहता दररोज ८ ते १० ग्लासपेक्षा जास्त पाणी प्यावे. तसेच नारळपाणी, ताज्या फळांचा रस, ताक, लस्सी, कांजी, लिंबूपाणी, तसेच ओआरएस भुकटी पाण्यात टाकून घेत राहावी. साखरेचे वा अल्कोहोलचे प्रमाण जास्त असलेली पेये घेऊ नयेत. त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होते. तसंच बाहेरील थंड पेय घेणं टाळावे. आहारमध्ये काकडी, संत्री, कलिंगड आणि लिंबू, कांदा यांचा भरपूर वापर करावा असा डॉक्टरांचा सल्ला आहे .
विशेष काळजी घेणे गरज
उन्हाची तीव्रता, वाढत्या तापमानाचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असून उन्हाची बाधा झाल्याने डायरिया, जुलाब, उलट्या, ताप या रुग्णांमध्ये वाढ होत आहे .तीव्र प्रमाणात ऊन लागल्यास उष्माघात तसेच बीपी-शुगरच्या रुग्णांमध्ये स्ट्रोक बसण्याचीही शक्यता असल्याने उन्हापासून बचावासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. -डॉ. रवींद्र राजपुरे, पाटोदा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.