आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना वडवणी शहरात मात्र चार ते पाच पॉझिटिव्ह रुग्ण बिनबोभाटपणे कोविड सेंटरमधून बाहेर पडत विनामास्क फळ व इतर साहित्याची खरेदी करत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे कोविड सेंटरमधील डॉक्टर व वॉर्डबॉइजला धमकावून कंपाउंडवरून उड्या घालून हे विनामास्क बाहेर पडत आहेत. पोलिस व प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने त्यांचे अधिकच फावत आहे.
रविवारी (ता.२ मे) दुपारी १ वाजेच्या सुमारास कोविड सेंटरवर उपचार घेणारे चार ते पाच रुग्ण हे विनामास्क बाहेर पडले. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील गाड्यांवर त्यांनी फळे खरेदी केली. शिवाय एका दुकानातून पाण्याच्या बाटल्याही आणल्या. खरेदी आटोपल्यावर हे रुग्ण बिनबोभाटपणे कोविड सेंटरमध्ये दाखलही झाले. वडवणीत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, आनंद मंगल कार्यालय व राजर्षी शाहू महाराज विद्यालय अशा तीन ठिकाणी कोविड सेंटर सुरू आहेत. दोनशेहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण याठिकाणी उपचार घेताहेत.
या कोविड सेंटरवर प्रशासनाकडून खाण्यापिण्याची व्यवस्था होत नसल्याची तक्रार रुग्णांतून होत आहे. जेवण वेळेवर न मिळाल्याचे कारण देत रविवारी आनंद मंगल कार्यालयातील तीन, तर राजर्षी शाहू महाराज विद्यालयातील एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण विनामास्क बाहेर पडले. या प्रकाराबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तहसीलदार वैशाली पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद होता.
थेट अंगावर धावून येतात सेंटरमधील रुग्ण
शहरातील कवडगाव रस्त्यावरील दोन कोविड सेंटरवरील रुग्ण हे त्याठिकाणी असलेल्या कर्मचारी, डॉक्टर व वॉर्डबॉय यांना घाबरत नाहीत. काही विचारले, सांगितले की थेट अंगावर धावतात. त्यामुळे आम्ही वडवणी पोलिस ठाण्याला संरक्षण मिळण्यासाठी पत्र दिलेले आहे. मात्र, अद्याप पोलिस आले नाहीत. कंपाउंडवरून उडी मारून हे रुग्ण बाहेर जात आहेत.’ - डॉ. रविकांत चौधरी, प्रभारी नोडल अधिकारी, कोविड सेंटर, वडवणी.
दोन दिवसांपासून चर्चा होती
वडवणीतील कोविड सेंटरवरून काही रुग्ण बाहेर पडून फळ व साहित्य खरेदी करत असल्याची चर्चा होती. रविवारी हा प्रकार चित्रीकरणामुळे स्पष्ट झाला आहे. विशेष म्हणजे जे रुग्ण बाहेर पडले होते त्यांनी मास्कही लावले नव्हते. अशाने रुग्ण वाढणार नाहीत तर काय होईल? -विनायक मुळे, उपाध्यक्ष, व्यापारी महासंघ.
मंगल कार्यालयातील तीन, तर राजर्षी शाहू महाराज विद्यालयातील एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण विनामास्क बाहेर पडले. या प्रकाराबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तहसीलदार वैशाली पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.