आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लोडला पार पडणार प्रवेश सोहळा:शिंदेंच्या बंडाचे समर्थन, प्रा. नवलेंना मिळेल का आमदारकी

बीड / दिनेश लिंबेकर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युती सरकारच्या काळात बीडचे प्रा. सुरेश नवले यांनी शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींविरुद्ध बंड केल्याने शिवसेनेने नारायण राणे यांना मुख्यमंत्री पदावर बसवले होते. प्रा. नवले यांनी राणेंना साथ दिल्याने राणे यांनी काँग्रेसमध्ये विधान परिषदेचे आमदार करत नवलेंच्या साथीची परतफेड केली होती. आता एकनाथ शिंदे हे ४० आमदारांसह शिवसेनेच्या बाहेर पडल्यानंतर बीडमधून प्रा. नवले यांनी शिंदे यांचे समर्थन करत त्यांच्या बंडाला साथ दिली. येत्या रविवारी सिल्लोड येथे नवले हे त्यांच्या बंधूंसह शिंदे गटात दाखल होत आहेत.

भविष्यात शिंदे हे नवले यांना आमदारकी देणार का? हा प्रश्न बीडकरांकडून उपस्थित होत आहे. कारण आजपर्यंतच्या नवलेंच्या राजकीय इतिहासात बंडाला समर्थन दिल्यानंतर आमदारकीची बक्षिसी त्यांच्या पदरात पडते असा अनुभव आहे. युतीच्या काळात उर्जा राज्यमंत्री असलेले प्रा. सुरेश नवलेंसह बंडखोर नेते गणेश नाईक व गुलाबराव गावंडे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींविरुद्ध बंड केल्याने शिवसेनेने राणेंना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळाली होती. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर प्रा. नवलेंनी बीडमध्ये जनशक्तीचा प्रयोग केला होता. परंतु, तो फारसा यशस्वी झाला नाही. राणेंच्या बंडात प्रा. नवलेंनी त्यांचे समर्थन केल्याने त्याची परतफेड म्हणून राणेंनी नवलेंना काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार केल्याने त्यांचे राजकीय पुनर्वसन झाले होते. बीडमध्ये राणे समर्थक म्हणून प्रा. नवले हे काम करत होते. पुढे राणेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपत प्रवेश केला तेव्हा नवले हे राणेंच्या बरोबर भाजपत न जाता काही काळ राजकारणापासून अलिप्त होते.

बीडमध्ये अशी बदलणार समीकरणे
एकनाथ शिंदेंच्या भूमिकेचे प्रा. नवलेंच्या मित्रमंडळानंतर सेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी शिंदेंचे समर्थन केले होते. आता शिंदे गटाचे शिवसेना सचिव संजय मोरे यांनी जिल्ह्याचे नवीन जिल्हाप्रमुख म्हणून अनुक्रमे सचिन मुळूक व कुंडलिक लहाने यांची नियुक्ती केली. त्यामुळे जिल्ह्यात एकेकाळी सेनेत असलेल्या नवले, मुळूक व खांडे यांना एकत्र येऊन आगामी जि.प., पालिका निवडणुकीत शिंदे गटाचे जोमाने काम करावे लागेले. प्रा. नवलेंना एकनाथ शिंदे हे राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदार करतात का हे पाहवे लागणार आहे.

रविवारी प्रवेश निश्चित
माजी मंत्री अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघातील सिल्लोड येथे माजी मंत्री प्रा. सुरेश नवले, त्यांचे बंधू शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख चंद्रकांत नवले यांच्यासह त्यांचे समर्थक रविवारी (३१ जुलै) सिल्लोड येथील मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमात शिंदे गटात जाहीरपणे सहभागी होणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...