आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका घरकुलाने घेतले दोन बळी:आधी नातवाचा आणि आता आजोबाचा मृत्यू, बीड मधील संतापजनक घटना

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घरकुलाच्या मागणीसाठी शासनाच्या दाराशी प्राण गमवावे लागणे संतापजनक
  • सुप्रिया सुळे यांनी केली कारवाईची मागणी

रद्द करण्यात आलेल्या घरकुलाला पुन्हा मंजुरी मिळावी या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वासनवाडी येथील कुटुंबीय गेल्या दोन दिवसापासून उपोषणाला बसले होते. उपोषणकर्त्या आप्पाराव भुजंग पवार (वय 58) यांचा मृत्यू झाला. प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे त्यांना पण गमवावे लागले असल्याचा आरोप करत, या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या प्रशासनातील व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे स्थानिक प्रशासनाने वेळेवर उपोषणाची दाखल घेतली असती तर आप्पाराव पवार यांचा जीव वाचला असता. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच सदरील व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप होत आहे.

थंडीने कुडकुडत मृत्यूला कवटाळले

घरकुलाच्या मागणीसाठी पवार कुटुंबाने दोन डिसेंबर रोजी प्रशासनाला निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या आधी देखील त्यांना घरकुल मंजूर झाले होते. अनुदानाचा एक हप्ता देखील मिळाला होता. मात्र, त्यानंतर ती मंजुरी रद्द करण्यात आली. त्यामुळे कुटुंबीयांनी उपोषण सुरू केले होते. मात्र, प्रशासनाने निवेदन स्वीकारण्यापलीकडे कोणतीच कारवाई केली नाही. दरम्यान उपोषणाला बसलेले आप्पाराव यांची प्रकृती खालावली. मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता. अशा परिस्थितीत रात्रभर थंडीच्या कडाक्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

एका घरकुलासाठी दोन बळी

पवार कुटुंब यांच्या वतीने घरकुलासाठी अनेक वर्षापासून आंदोलन सुरू आहे. यापूर्वी देखील उपोषण स्थळी आप्पाराव पवार यांची सून प्रसूत झाली होती. उपोषण सुरू असतानाच नातवाला डेंगू झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता आप्पाराव पवार यांचा देखील मृत्यू झाला आहे. माझा नातू आणि पती दोघांनीही जीव गमावला असल्याची खंत अप्पाराव पवार यांच्या पत्नी कविता यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

प्रशासनाचे वरातीमागून घोडे

अप्पाराव यांच्या मृत्यूनंतर बीड जिल्हाधिकारी कार्यालयात धावफळ झाली. उपोषणकर्त्यांची मागणी तात्काळ मंजूर करण्यासाठी बैठक बोलण्यात आल्याचे पत्र पवार कुटुंब यांना देण्यात आले. मात्र न्याय मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, अशी भूमिका पवार कुटुंबीयांनी मांडली.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

'घरकुलाच्या मागणीसाठी बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आप्पाराव पवार यांचा मृत्यू झाला. त्यांच्या उपोषणाची वेळीच दखल घेण्यात आली नाही त्यामुळेच त्यांना प्राण गमावावे लागले. ही अतिशय गंभीर घटना आहे. हक्काचे घर मागणाऱ्या गरीब व्यक्तीला शासनाच्या दाराशी प्राण गमावावे लागतात ही बाब प्रचंड संतापजनक आहे. माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नम्र विनंती आहे की कृपया या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या शासन प्रशासनातील व्यक्तींवर कठोर कारवाई करावी.'

बातम्या आणखी आहेत...