आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पाटोदा रुग्णालयात प्रत्येक बुधवारी शस्त्रक्रिया

पाटोदा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटोदा ग्रामीण रुग्णालयात आता जनरल सर्जरीच्या सुविधा व तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध झाले असून आता या ठिकाणी प्रत्येक बुधवारी गोरगरीब व गरजू रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. यामुळे पाटोदा व परिसरातील गोरगरीब व गरजू रुग्णांना मोठा आधार ठरणार आहे.

तालुका हा प्रामुख्याने अवर्षणग्रस्त व ऊसतोड कामगारांचा तालुका म्हणून ओळखला जातो. अशा या भागातील गोरगरीब रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालय हा मोठा आधार असतो. त्यामुळे गरजू व गोरगरीब रुग्ण हे मोठ्या संख्येने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात येत असतात. कोणत्याही खासगी दवाखान्यात एखादी शस्त्रक्रिया करायचे म्हटले तर प्राथमिक तपासण्यांपासून ते शस्त्रक्रिया होईपर्यंत भरमसाठ खर्च येतो व हा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरचा असतो त्यामुळे अशा गरजू व गोरगरीब रुग्णांना चांगले व दर्जेदार उपचार मिळावेत या हेतूने शासनाकडून ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी जनरल सर्जरीच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पाटोदा येथील ग्रामीण रुग्णालयात आता जनरल सर्जरीच्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये सुसज्ज शस्त्रक्रिया गृह तसेच आवश्यक साधनसामग्री व भूलतज्ज्ञ देखील उपलब्ध झालेले आहेत. आता पाटोदा ग्रामीण रुग्णालयात प्रत्येक बुधवार हा शस्त्रक्रियांसाठी ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी हर्निया, पाइल्स, अपेंडिक्स स्त्रियांचे आजार, सिझेरियन व कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाही केल्या जाणार आहेत. यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सदाशिव राऊत, डॉ. सूर्यकांत सावंत, डॉ.निवृत्ती मुंडे डॉ. इमरान शेख, डॉ. कृष्णा नागरगोजे, डॉ.खाडे, भूलतज्ज्ञ डॉ.शुभांगी ओमासे आदी तज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णांवर शस्त्रक्रिया करणार आहे. शस्त्रक्रियेपूर्वी रक्तचाचण्या, इतर तपासण्या या सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

सिझेरियनची सुविधा उपलब्ध पाटोदा ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन सुविधा सुरू असून याचा गरजू व गोरगरिबांना रुग्णांना फायदा होत आहे खासगी दवाखान्यात सिझेरियन साठी मोठा खर्च येतो मात्र ग्रामीण रुग्णालयात चांगल्या दर्जाच्या सुविधा रुग्णांना मिळत आहेत यामुळे रुग्णांनी समाधान व्यक्त केल आहे.

रुग्णांनी ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधावा
पाटोदा ग्रामीण रुग्णालयात जनरल सर्जरीच्या सुविधा उपलब्ध आहेत, गरजू रुग्णांना याचा निश्चितच उपयोग होणार आहे यासाठी रुग्णांनी आवश्यक तपासण्या व नोंदणी करून घ्यावी. दर बुधवारी रुग्णालयात गरजू रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. यासाठी रुग्णांनी ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क करावा. -डॉ. सदाशिव राऊत, वैद्यकीय अधीक्षक

बातम्या आणखी आहेत...